विदेशी सायबर ठगांना ओटीपी पुरविणार्‍या टोळीचा पर्दाफाश

सायबर ठगांच्या संपर्कात असलेल्या चौघांना त्रिपुरा येथून अटक

0

अरुण सावरटकर
15 मार्च 2026
मुंबई, – ऑनलाईन फसवणुकीच्या वेगवेगळ्या गुन्ह्यांत विदेशी सायबर ठगांना व्हॉटअप आणि टेलिग्राम ओटीपी पुरविणार्‍या एका टोळीचा पश्चिम प्रादेशिक विभागाच्या अधिकार्‍यांनी पर्दाफाश केला आहे. या सायबर ठगांच्या संपर्कात असलेल्या चार आरोपींना त्रिपुरा येथून पोलिसांनी अटक केली आहे. शंतनू सेन, सुब्राता बर्मन, जॉयदेव रॉय आणि अभिजीत शिल अशी या चौघांची नावे असून फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत वांद्रे येथील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात मोबाईल, सिमकार्डचा साठा तसेच बँक खाते उघडण्यासाठी आवश्यक असलेले साहित्य पोलिसांनी जप्त केला आहे. त्यांच्या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे बाहेर येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहेत.

मेघना देवेंद्र कामत ही महिला अंधेरी परिसरात राहत असून फॅशन डिझायनर म्हणून काम करते. डिसेंबर 2024 रोजी तिला तिच्या घरी असताना एका अज्ञात व्यक्तीने कॉल करुन तो ट्रायमधून बोलत असल्याचे सांगितले. तिचा मोबाईल दोन तासांत बंद होणार आहे. तिच्या मोबाईलवरुन अनेकांना फसवणुकीचे मॅसेज प्राप्त झाले आहे. त्यामुळे सायबर सेलने तिचा मोबाईल बंद करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर तिला दिल्ली सायबर सायबर सेलमधील सुनिलकुमार गौतम नावाच्या एका तोतया पोलिसाने कॉल केला होता. त्याने तिच्याविरुद्ध दिल्लीत गुन्हा दाखल झाला असून तिच्या कागदपत्रांवरुन विविध बँकेत खाते उघडण्यात आले आहे. त्यानंतर त्याने तिला तिचे वरिष्ठ अधिकारी राजेश्वर प्रधान यांच्याशी बोलण्यास सांगितले.

काही वेळानंतर तिला राजेश्वरने व्हिडीओ कॉल केला होता. यावेळी समोरील व्यक्तीने पोलीस गणवेश घातला होता. त्याने तिच्या बँक खात्यात मनी लॉड्रिंगचे काही व्यवहार झाल्याचा आरोप करुन तिला या गुन्ह्यांत अटक केली जाणार आहे. तिला 90 दिवस पोलीस कोठडीत राहावे लागेल अशी भीती दाखविली. त्यानतर तिला डिजीटल अरेस्ट केल्याचे सांगून तिला चौकशी पूर्ण होईपर्यंत कोणाशी बोलता येणार नाही, भेटता येणार नाही असे सांगितले. तिच्या बँक खात्याची माहिती काढून त्यांनी तिला बँकेतील सर्व रक्कम त्याने दिलेल्या बँक खात्यात ट्रान्सफर करण्यास सांगितले. तिने सहकार्य केले नाहीतर तिला तिच्या राहत्या घरातून अटक केली जाईल अशी धमकी दिली.

अटकेच्या भीतीला घाबरुन तिने त्याने दिलेल्या बँक खात्यात 33 लाख 50 हजार रुपये ट्रान्स्फर केले होते. चौकशी पूर्ण झाल्यानंतर ही रक्कम तिच्या बँक खात्यात पुन्हा पाठविली जाईल असे सांगितले. मात्र काही महिने उलटूनही त्यांनी ती रक्कम तिच्या बँक खात्यात ट्रान्स्फर केली नाही. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच पश्चिम सायबर सेल पोलिसांत तक्रार केली होती. याप्रकरणी भारतीय न्याय सहिता आणि आयटीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तपास सुरु केला होता. तांत्रिक माहितीवरुन वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुवर्णा शिंदे यांच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक पूनम जाधव, नितीन गच्चे, सविता कदम, पोलीस उपनिरीक्षक विजयकुमार घोरपडे, दिपक तायडे व अन्य पोलीस कर्मचार्‍यांनी त्रिपुरा येथून चार संशयितांना ताब्यात घेतले होते.

चौकशीत शंतनू सेन, सुब्राता बर्मन, जॉयदेव रॉय आणि अभिजीत शिल यांचा गुन्ह्यांत सहभाग उघडकीस आला होता. त्यानंतर या चौघांना पोलिसांनी अटक केली. तपासात अभिजीत हा सिमकार्ड एजंट असून त्याने गुन्ह्यांतील व्हॉटअप आणि टेलिग्राम अकाऊंटसाठी सिमकार्ड पुरविल्याचे उघडकीस आले. त्याने तीसहून अधिक सिमकार्ड संबंधित आरोपींना दिले होते. याच आरोपींनी व्हॉटअपवर ओटीपी चायनिससह विदेशी सायबर ठगांना दिले होते तर शंतनू हा नवीन व्हॉटअप अ‍ॅप खाते उघडून देण्यासाठी सायबर ठगांना मदत करत होता. त्याने एक व्हॉटअप ग्रुप बनविला होता.

या ग्रुपसह ओटीपीचा फसवणुकीसाठी सायबर ठग वापर करत असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. या कारवाईत पोलिसांनी मोठ्या प्रमाणात मोबाईल, सिमकार्ड, लॅपटॉप, स्टॅम्प, पैसे मोजण्याचे यंत्र, रिकामे सिमकार्ड पॅकेट, डेबीट कार्ड, पासबुक, पॅनकार्ड, एअरटेल राऊटर आणि कॅश आदी मुद्देमाल जप्त केला आहे. अटकेनंतर या चारही आरोपींना वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते, यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page