रिसॉर्टमध्ये रुम बुकच्या बहाण्याने ऑनलाईन फसवणुक
मर्चंट नेव्ही अधिकार्याला गंडा घालणार्या ठगाला अटक
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
28 मार्च 2026
मुंबई, – रिसॉर्टमध्ये रुम बुक करण्याच्या बहाण्याने मर्चंट नेव्हीच्या एका अधिकार्याची ऑनलाईन फसवणुक केल्याप्रकरणी वॉण्टेड असलेल्या आरोपीस पवई पोलिसांनी अटक केली. दत्ता बनाराम केदार असे या आरोपीचे नाव असून फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत त्याला लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. फसवणुकीची रक्कम दत्ताच्या बँक खात्यात जमा झाल्याचे तपासात उघडकीस आले आहे. त्याच्या अटकेने अशाच इतर काही फसवणुकीच्या गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
जोसेफ जॉन जॉय हे मर्चंट नेव्हीमध्ये कामाला असून सध्या अंधेरीतील मरोळ परिसरातील एका निवासी अपार्टमेंटमध्ये राहतात. त्यांची पत्नी रोझी ही एका खाजगी कंपनीत कामाला असून त्यांचा मुलगा रायन हा शिक्षण घेतो. 2 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी सहा वाजता ते त्यांच्या घरी होते. यावेळी त्यांना एका रिसॉर्टमध्ये रुम बुक करायचा होता. त्यासाठी ते गुगलमध्ये रिसॉर्टची माहिती घेत होते. याच दरम्यान त्यांना गुगलमध्ये एका रिसॉर्टची माहितीसह मोबाईल क्रमांंक सापडला होता. त्यामुळे त्यांनी संबंधित मोबाईलवर संपर्क साधला होता. यावेळी समोरील व्यक्तीने रिसॉर्टचे फोटो पाठवून त्यांचा विश्वास संपादन केला होता.
रिसॉर्टचे रुम आवडल्याने त्यांनी त्याच्याकडे दोन रुम बुक केले होते. त्यासयाठी त्यांनी आगाऊ बारा हजार रुपयांचे पेमेंट द्यावे लागेल असे सांगितले. त्यामुळे त्यांनी त्याने पाठविलेला क्यूआर कोड स्कॅन करुन त्याला बारा हजार रुपये ट्रान्स्फर केले होते. मात्र ही रक्कम रिसॉर्टच्या बँक खात्यात न जाता कुणाल कॉन्फेक्शनरी नावाच्या बँक खात्यात जमा झाले होते. हा प्रकार संशयास्पद वाटताच त्यांनी त्याला कॉल करुन विचारणा केली, मात्र त्याने उडवाउडवीचे उत्तर देऊन त्यांचा कॉल बंद केला होता. नंतर त्याने त्यांच्या मोबाईलक क्रमांक ब्लॉक केला होता. फसवणुकीचा हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी पवई पोलिसांना घडलेला प्रकार सांगून तिथे अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार केली होती.
याप्रकरणी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपीचा शोध सुरु केला होता. तांत्रिक माहितीवरुन पोलिसांनी दत्ता केदार या संशयिताला ताब्यात घेतले होते. चौकशीत त्याचा या गुन्ह्यांत सहभाग उघडकीस आला होता. याच गुन्ह्यांत नंतर त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टाने सोमवार 30 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सध्या तो पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.