मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
31 मार्च 2026
मुंबई, – गांजा विक्रीसाठी आलेल्या एका त्रिकुटाला मालवणी पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली. लवकुश फुलचंद वर्मा, अंकितकुमार मानसिंग आणि सितू रामकुमार वर्मा अशी या तिघांची नावे असून ते तिघेही मूळचे उत्तरप्रदेशचे रहिवाशी आहे. या कारवाईत पोलिसांनी 37 किलो गांजाचा साठा जप्त केला असून त्याची किमंत साडेअठरा लाख रुपये आहे. त्यांच्याविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत कारवाई करण्यात आली असून अटकेनंतर तिन्ही आरोपींना बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
गेल्या काही वर्षांत मुंबई शहरात ड्रग्ज तस्करीच्या गुन्ह्यांत लक्षणीय वाढ झाली होती, त्यामुळे अशा ड्रग्ज तस्कराविरुद्ध मुंबई पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही मोहीम सुरु असताना काहीजण मालाडच्या मालवणी परिसरात गांजाची डिलीव्हरीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत मुंढे, पोलीस उपनिरीक्षक डॉ. दिपक हिंडे, पोलीस हवालदार अनिल पाटील, चिकणे, स्वप्नील काटे, मुद्देसर देसाई, साजिद शेख, धर्माधिकारी आदी पथकाने मालवणी परिसरात गस्त सुरु केली होती.
ही गस्त सुरु असताना सोमवारी रात्री तीन वाजता मार्वे रोड, पूनम रोज नर्सरीजवळ तीन संशयितांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यांच्यासह त्यांच्याकडील सामानाची झडती घेतल्यानंतर त्यात पोलिसांना 37 किलो गांजाचा साठा सापडला. या गांजाची किंमत 18 लाख 50 हजार रुपये इतका आहे. याच गुन्ह्यांत नंतर लवकुश वर्मा, अंकित मानसिंग आणि सितू वर्मा या तिघांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
ते तिघेही मूळचे उत्तरप्रदेशच्या प्रतापगढचे रहिवाशी असून सध्या भिवंडीतील कनेर परिसरात राहतात. अटकेनंतर तिन्ही आरोपींना मंगळवारी दुपारी बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते, यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.