लाईट पोस्टिंगसाठी हवालदार महिलकडे लाचेची मागणी करणे महागात पडले
काशिमिरा वाहतूक विभागाच्या दोन पोलिसांविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
1 एप्रिल 2026
मुंबई, – लाईट पोस्टिंगसाठी सहकारी पोलीस हवालदार महिलेकडे साहेबांसाठी पंधरा हजार आणि स्वतसाठी अडीच हजार रुपयांची मागणे दोन पोलीस अधिकार्यांना चांगलेच महागात पडले आहे. लाच मागितल्याचे तपासात उघडकीस येताच या दोन्ही पोलीस अधिकार्याविरुद्ध मुंबई युनिटच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. त्यात काशिमिरा वाहतूक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सागर बी इंगोले आणि सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मनोज ए गोल्हार यांचा समावेश आहे. या दोघांची लवकरच संंबंधित पोलिसांकडून चौकशी होणार आहे. या चौकशीनंतर त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई होणार आहे.
कमल बाबूराव चव्हाण ही महिला पोलीस हवालदार असून सध्या ती काशिमिरा वाहतूक विभागात कार्यरत आहेत. काही वैयक्तिक कारणास्तव तिने लाईट पोस्टिंग मिळावी यासाठी प्रभारी पोलीस निरीक्षक सागर इंगोले यांच्याकडे विनंती अर्ज केला होता. या अर्जानंतर सागर इंगोले यांनी तिच्याकडे लाईट पोस्टिंगसाठी पंधरा हजाराच्या लाचेची मागणी केली होती. तसेच याबाबत ड्यूटी अंमलदार असलेले सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मनोज गोल्हार यांच्याशी बोलण्यास सांगितले होते. त्यामुळे तिने मनोज गोल्हारशी चर्चा केली होती. यावेळी त्याने तिला लाईट पोस्टिंगसाठी साहेंबासाठी पंधरा हजार तर स्वतसाठी अडीच हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.
ही लाच दिल्याशिवाय तिला पोस्टिंग मिळणार नाही असे सांगितले होते. त्यामुळे तिने लाच देण्याची तयारी दर्शवून या दोन्ही अधिकार्यांविरुद्ध मुंबई युनिटच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली होती. 5 सप्टेंबर 2025 रोजी तिचा तक्रार अर्ज प्राप्त होताच पोलिसांनी त्याची शहानिशा केली होती. त्यात सागर इंगोले आणि सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मनोज गोल्हर यांनी तिच्याकडे पोस्टिंग देण्यासाठी अनुक्रमे पंधरा हजार आणि अडीच हजार रुपयांची लाच स्विकारण्याची तयारी दर्शविली होती.
हा प्रकार उघडकीस येताच सरकारच्या वतीने सहाय्यक पोलीस आयुक्त दयानंद विठ्ठल सावंत यांनी सागर इंगोले आणि सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मनोज गोल्हार यांच्याविरुद्ध 7, 12 भष्ट्राचार प्रतिबंध अधिनियम 1988 अन्वये गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यांचा तपास महिला पोलीस निरीक्षक शर्मिली पाटील यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
गुन्हा दाखल झाल्याने या दोघांची लवकरच पोलिसांकडून चौकशी करुन जबानी नोंदविण्यात येणार आहे. त्यापूर्वी त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजाविण्यात आले आहे. लाईट पोस्टिंगसाठी सहकारी कर्मचारी महिलेकडून लाचेची मागणी करणे या दोघांना चांगलेच महागात पडले आहे. या घटनेची पोलीस आयुक्तांनी गंभीर दखल घेत या दोघांची विभागीय चौकशी करण्याचे आदेश दिले आहे.