एपीके फाईल पाठवून लघुवाद कोर्टाच्या न्यायमूर्तींची फसवणुक

अज्ञात सायबर ठगाविरुद्ध फसवणुकीसह आयटीचा गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
1 एप्रिल 2026
मुंबई, – कस्टमर सपोर्ट अ‍ॅप डाऊनलोड करण्यासाठी एपीके फाईल पाठवून लघुवाद कोर्टाच्या एका न्यायमूर्तींची अज्ञात सायबर ठगाने फसवणुक केल्याचा धक्कादायक प्रकार ताडदेव परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून ताडदेव पोलिसांनी अज्ञात सायबर ठगाचा शोध सुरु केला आहे. मोबाईलच्या डिसप्लेटची तक्रार नोंदविण्यासाठी गुगलवर मोबाईल क्रमांकाचा मोबाईल क्रमांक शोधून या क्रमांकावर संपर्क साधणे या न्यायमूर्तींना चांगलेच महागात पडले आहे. दरम्यान या घटनेची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत ताडदेव पोलिसांसह सायबर सेल पोलिसांना संयुक्तपणे तपास करण्याचे आदेश दिले आहेत.

46 वर्षांचे तक्रारदार ताडदेव परिसरात राहत असून सध्या लघुवाद कोर्टात न्यायमूर्ती म्हणून कार्यरत आहेत. सोमवारी ते नेहमीप्रमाणे कोर्टात गेले होते. दुपारी सव्वादोन वाजता त्यांच्या मोबाईलचा डिसप्लेवर गुलाबी रंगाची लाईन येत असल्याने त्यांनी मोबाईल कंपनीच्या कस्टमर केअरचा मोबाईल क्रमांक मिळविण्यासाठी गुगलवर सर्च केले होते. यावेळी त्यांन गुगलवर एक मोबाईल क्रमांक सापडला. त्यामुळे त्यांनी संबंधित मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र तो क्रमांक सतत व्यस्त येत होता.

काही वेळानंतर त्यांना दुसर्‍या मोबाईलवरुन एका अज्ञात व्यक्तीने कॉल करुन तो मोबाईल कंपनीच्या कस्टमर केअरमधून बोलत असल्याचे सांगितले. त्यांनी त्यांच्या मोबाईलच्या डिसप्लेवरील गुलाबी रंगाबाबत तक्रार केली होती. यावेळी त्यांनी त्यांना मोबाईल डिसप्ले बदलून मिळेल असे सांगून त्यांना ऑनलाईन तक्रार करण्याचा सल्ला दिला होता. ही तक्रारदार रजिस्टर झाल्यनंतर त्यांच्या तक्रारीची दखल घेतली जाईल असे सांगून त्यांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्याने सांगितल्याप्रमाणे त्यांनी कस्टमर सर्व्हिस अ‍ॅप डाऊनलोड करण्यासाठी एपीके फाईल पाठविली होती.

ही फाईल ओपन करुन त्यांनी कस्टमर सपोर्ट अ‍ॅप डाऊनलोड केले होते. तिथे तक्रार नोंदविल्यानंतर त्यांना दहा रुपये भरण्यास सांगण्यात आले होते, त्यामुळे त्यांनी ऑनलाईन दहा रुपये भरण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांच्याकडून चुकून दोन वेळा दहा रुपयांचे पाठविण्यात आले होते. ही रक्कम पाठविल्यानंतर त्यांच्या तक्रारीची प्रोसेसिंग सुरु असल्याचे सांगण्यात आले होते. घरी गेल्यानंतर त्यांनी त्यांचे गुगल पे अकाऊंटची पाहणी केली असता त्यांना त्यांच्या खात्यातून 90 हजार आणि तीन हजार रुपये असे 93 हजार रुपये डेबीट झाल्याचे दिसून आले.

ही रक्कम पप्पू सचिन यादव नावाच्या एका व्यक्तीच्या बँक खात्यात ट्रान्स्फर झाली होती. कस्टमर सपोर्ट अ‍ॅप डाऊनलोड करण्यासाठी अज्ञात व्यक्तीने त्यांना एपीके फाईल पाठवून त्यांचा मोबाईल हॅक करुन बँक खात्याची माहिती घेऊन ही फसवणुक केली होती. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी सायबर हेल्पलाईन क्रमांकासह ताडदेव पोलिसांना हा प्रकार सांगून अज्ञात सायबर ठगाविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर पोलिसांनी अज्ञात सायबर ठगाविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page