बोगस ओटीपी प्राप्त करुन लॅपटॉपचा अपहार करुन फसवणुक

फसवुणकीप्रकरणी अ‍ॅमेझॉनच्या डिलीव्हरी बॉयला अटक

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
2 एप्रिल 2026
मुंबई, – बोगस ओटीपी प्राप्त करुन ऑर्डर केलेल्या महागड्या लॅपटॉपचा परस्पर अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी अ‍ॅमेझॉनच्या एका डिलीव्हरी बॉयला बांगुरनगर पोलिसांनी अटक केली. समीर अकबर शेख असे या आरोपीचे नाव असून फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत त्याला त्याचा मित्र साबीर खान याने मदत केल्याचे तपासात उघडकीस आले असून त्याला या गुन्ह्यांत पाहिजे आरोपी दाखविण्यात आले आहे. त्याचा पोलीस शोध घेत आहेत.

ओमकार सूर्यकांत पाटील हे मालाड परिसरात रहात असून एका खाजगी कंपनीत मनुष्यबळ व्यवस्थापक म्हणून काम करतात. कंपनीत कर्मचार्‍यांची भरती, त्यांचे वेतन, कल्याण, समपदेशन, भविष्य निर्वाह निधी, त्यांच्या अडचणीचे निवारण करणे तसेच कंपनीच्या अ‍ॅमेझॉन ई कॉमर्स खात्यावरुन आवश्यक साहित्य करणे आदी काम पाहतात. त्यांना कंपनीसाठी एका लॅपटॉपची गरज होती. 9 मार्चला त्यांनी कंपनीच्या अ‍ॅमेझॉन खात्यातून 49 हजार 990 रुपयांचा एक लॅपटॉप ऑर्डर केला होता. या लॅपटॉपची डिलीव्हरी त्यांनी मालाडच्या माईडस्पेस, लेमन ट्री प्रिमिअर हॉटेलसमोरील अनिन फॉचुना, ए/502 मध्ये करण्यास सांगितले होते.

ऑनलाईन पेमेंट केल्यानंतर त्यांना लॅपटॉपची डिलीव्हरी तारीख 13 मार्च दाखविण्यात आली होती. मात्र त्या दिवशी लॅपटॉपची डिलीव्हरी झाली नाही. त्यामुळे त्यांनी कंपनीच्या नोंदणीकृत ईमेल आयडीवर मॅसेज पाठविला होता. यावेळी त्यांना लॅपटॉप डिलीव्हरीसाठी संबंधित पत्त्यावर आला असून त्याचा ओटीपी क्रमांक कंपनीला प्राप्त झाला असा मॅसेज आला होता. यावेळी त्यांनी त्यांचा कुठलाही डिलीव्हरी बॉय लॅपटॉप घेऊन आला नाही किंवा त्याला त्यांनी कुठलाही ओटीपी क्रमांक शेअर केला नाही असे सांगितले. त्यामुळे त्यांनी अ‍ॅमेझॉनवर ऑनलाईन तक्रार केली होती, मात्र त्यांच्या तक्रारीची कंपनीने दखल घेतली नाही.

हा प्रकार संशयास्पद वाटताच त्यांनी बांगुरनगर पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर पोलिसांनी अज्ञात डिलीव्हरी बॉयविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी कंपनीचा डिलीव्हरी बॉय समीर शेख याला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. तपासात त्याने समीरने फसव्या मार्गाने कंपनीच्या अधिकृत ईमेलमधील ओटीपी प्राप्त करुन लॅपटॉप डिलीव्हरी न करता त्याचा परस्पर अपहार केला होता.

याकामी त्याला त्याचा मित्र साबीर खान याने फसव्या मार्गाने लॅपटॉप बोगस मार्गाने डिलीव्हरी केल्याचे भासवून या लॅपटॉपचा अपहार केल्याचे उघडकीस आले. हा प्रकार उघडकीस येताच समीर शेख याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. समीर आणि साबीर याने अशाच प्रकारे इतर काही महागड्या वस्तूंचा अपहार करुन कंपनीची फसवणुक केली आहे का याचा पोलीस तपास सुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page