अपहरणासह खंडणी व दरोड्याच्या गुन्ह्यांत मसुबच्या जवानाला अटक

यापूर्वी दोन पोलीस अटकेत तर इतर आरोपींचा शोध सुरु

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
3 एप्रिल 2026
मुंबई, – विदेशी चलनाची डिलीव्हरीसाठी जाणार्‍या खाजगी कंपनीच्या एका अधिकार्‍याचे अपहरणासह कारमध्ये बेदम मारहाण करुन त्यांच्याकडील दहा हजार डॉलर विदेशी चलन लुटमार करुन पळून गेलेल्या कटातील अन्य एका आरोपीस जुहू पोलिसांनी अटक केली. सागर रामदास वाघ असे या महाराष्ट्र सुरक्षा बलाचा जवानाचे नाव असून अटकेनंतर त्याला वांद्रे येथील लोकल कोर्टाने सोमवार 6 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. यापूर्वी याच गुन्ह्यांत संदीप भिमराव शिंदे, गजेंद्र रतन राजपूत यांच्यासह अन्य एका आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. संदीप आणि गजेंद्र हे जोगेश्वरी आणि बीकेसी पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार आहे. सागरच्या अटकेने या गुन्ह्यांत अटक झालेल्या आरोपींची संख्या चार झाली असून इतर आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.

यातील तक्रारदार त्यांच्या कुटुंबियांसोबत विलेपार्ले येथे राहतात. वांद्रे येथील एका खाजगी फॉरेक्स कंपनीत ते वरिष्ठ अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. ही कंपनीत विदेशी चलनाची देवाणघेवाण करते. बुधवारी 25 मार्चला ते दहा हजार रुपयांचे अमेरिकन डॉलर्स एका पार्टीला देण्यासाठी कंपनीच्या एर्टिगा कारमधून जात होती. दुपारी दोन वाजता ही कार विलेपार्ले येथील जुहू सर्कलवरुन रोड क्रमांक दहावरुन जात होती. याच दरम्यान त्यांना पाचजणांच्या एका टोळीने थांबवून त्यांच्या कारमधून त्यांचे अपहरण केले.

जुहू येथून ते सर्वजण दहिसरच्या दिशेने निघाले होते. या प्रवासादरम्यान त्यांनी त्यांना बेदम मारहाण केली होती. पोलीस असल्याचे सांगून त्यांनी त्यांच्यावर कारवाईची धमकी दिली होती. दहिसर येथे आल्यानंतर त्यांनी आरडाओरड केल्याने स्थानिक लोकांनी ही कार थांबविली. याच दरम्यान कारमधून चारजण त्यांच्याकडील विदेशी चलन घेऊन पळून गेले तर संजय शिंदे याला लोकांनी पकडून दहिसर पोलिसांच्या ताब्यात दिले होते. याप्रकरणी अपहरणासह दरोडा, खंडणीचा गुन्हा दाखल होताच संजय शिंदेला पोलिसांनी अटक केली. त्याच्या अटकेनंतर गजेंद्रसह अन्य एका आरोपीला पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत ते तिघेही सध्या पोलीस कोठडीत आहे.

या गुन्ह्यांत सागर वाघसह इतर आरोपींचा सहभाग उघडकीस आला होता. त्यामुळे त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही शोधमोहीम सुरु असताना गुरुवारी सागरला पोलिसांनी अटक केली. तो सध्या महाराष्ट्र सुरक्षा बलात जवान म्हणून कार्यरत आहेत. अटकेनंतर त्याला शुक्रवारी दुपारी वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page