मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
3 एप्रिल 2026
मुंबई, – वैद्यकीय क्षेत्रातील कोणत्याही शाखेची पदवीसह वैद्यकीय शिक्षण नसताना क्लिनिक थाटून रुग्णांवर उपचार करणार्या गोवंडीतील दोन मुन्नाभाई एमबीबीएस तोतया डॉक्टरांना गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी अटक केली. राजीव कपिलदेव रंजन आणि कुबेरनाथ गोमती यादव अशी या दोघांची नावे असून अटकेनंतर या दोघांनाही पुढील कारवाईसाठी शिवाजीनगर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. अटकेनंतर या दोघांनाही लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावी आहे. या कारवाईत पोलिसांनी विविध औषधांसह इतर साहित्य जप्त केले आहेत.
मुंबई शहरात गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात बोगस डॉक्टर खाजगी क्लिनिक थाटून रुग्णांवर उपचार करत होते. त्यांच्याकडे कुठलीही वैद्यकीय पदवी तसेच वैद्यकीय शिक्षण नसताना ते रुग्णावर उपचार करुन त्यांच्याकडून भरमसाठ फि घेत होते. याबाबत अनेक तक्रारी महानगरपालिकेसह पोलिसांना प्राप्त झाले होते. त्यामुळे अशा बोगस डॉक्टरांविरुद्ध मुंबई पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही शोधमोहीम सुरु असताना गोवंडीतील शिवाजीनगर परिसरात अशाच प्रकारे काही बोगस डॉक्टर रुग्णांवर उपचार सुरु करुन त्यांच्याकडून भरमसाठ फी घेत असल्याची माहिती युनिट सहाच्या अधिकार्यांना मिळाली होती.
या माहितीनंतर पोलीस उपायुक्त विशाल ठाकूर, सहाय्यक पोलीस आयुक्त निनाद सावंत, प्रभारी पोलीस निरीक्षक भरत घोणे यांच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक मधुकर धुतराज, पोलीस उपनिरीक्षक संदीप रहाणे, नरेश नार्वेकर, सुहास देसाई, पोलीस हवालदार चव्हाण, तुपे, डगळे, मगर, वानखेडे, भालेराव, पोलीस शिपाई शिर्के, बोढारे यांनी शिवाजीनगर परिसरातील दोन वेगवेगळ्या क्लिनिकमध्ये छापा टाकला होता. या कारवाईत पोलिसांनी राजीव रंजन आणि कुबेरनाथ यादव या दोन बोगस डॉक्टरांना चौकशीसाठी ताब्यात घेतले.
त्यांच्याकडे वैद्यकीय प्रमाणपत्रासह इतर कागदपत्रांची मागणी केली असता त्यांच्याकडे काहीच कागदपत्रे सापडली नाही. त्यांच्याकडे वैद्यकीय परवाना नव्हता. महाराष्ट्र मेडीकल कौन्सिलमध्ये नोंदणी नसताना ते दोघेही लोकांना डॉक्टर असल्याचे भासवून तिथे क्लिनिक थाटून रुग्णांवर उपचार करत होते. या कारवाईत पोलिसांनी विविध प्रकारचे इंजेक्शन बॉटल्सख, सिरीज, अॅण्टीबायोटिक टॅबलेस आदी औषधे आणि वैद्यकीय साहित्य जप्त केले आहे.
त्यांच्याविरुद्ध दोन स्वतंत्र वैद्यकीय व्यवसाय अधिनियम कायदा कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले होते. याच गुन्ह्यांत त्यांना अटक करण्यात आली होती. अटकेनंतर त्यांना शुक्रवारी दुपारी लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.