मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
5 एप्रिल 2026
मुंबई, – रस्त्यावरुन जाणार्या तरुणीशी अश्लील चाळे करुन बाईकवरुन पळून जाणार्या एका सराईत आरोपीस बांगुरनगर पोलिसांनी अटक केली. मुख्तार नासीर खान असे या आरोपीचे नाव असून त्याने आतापर्यंत तीन तरुणींना भरस्त्यात विनयभंग करुन पलायन केल्याचे तपासात उघडकीस आले. त्याच्या अटकेने बांगुरनगर आणि समतानगर पोलीस ठाण्यातील तीन गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
तक्रारदार तरुणी ही 23 वर्षांची असून 30 मार्चला ती मालाड परिसरात आली होती. दुपारी दिड वाजता ती गोरेगाव स्पोटर्स क्लबजवळील गल्लीतून जात होती. यावेळी समोरुन बाईकने आलेल्या एका तरुणाने तिच्या छातीला नकोसा स्पर्श करुन तिचा विनयभंग केला होता. त्यानंतर तो सुसाट वेगाने बाईकने पळून गेला होता. या प्रकारानंतर या तरुणीला प्रचंड धक्का बसला होता. त्यामुळे तिने घडलेला प्रकार बांगुरनगर पोलिसांना सांगून पळून गेलेल्या तरुणाविरुद्ध तक्रार केली होती. अशाच प्रकारचा एक गुन्हा बांगुरनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला होता, या गुन्ह्यांचा तपास सुरु असताना विनयभंगाचा असा दुसरा गुन्हा घडल्याने त्याची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र आव्हाड यांना तपासाचे आदेश दिले होते.
या आदेशानंतर अतिरिक्त पोलीस आयुक्त शशिकुमार मीना, पोलीस उपायुक्त संदीप जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय सरोळकर, योगेश रंधे, पोलीस उपनिरीक्षक सुरज आमटे, पोलीस हवालदार राजेंद गळवे, पोलीस शिपाई नितीन दळवी, मिथुन गावित, निशिकांत शिंदे, कृष्णा केतके, श्रीकांत हरगुडे, विशाल जाधव यांनी तपास सुरु केला होता. परिसरातून 30 हून अधिक सीसीटिव्ही फुटेजची तपासणी केल्यानंतर संबंधित आरोपी गोरेगाव येथील आरे कॉलनी परिसरात गेल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर या पथकाने आरे कॉलनीतील मयुरनगर, एसआरए इमारतीजवळ साध्या वेशात पाळत ठेवून मुख्तार खान या 25 वर्षांच्या तरुणाला ताब्यात घेतले होते.
चौकशीत त्यानेच बांगुरनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन तरुणींचा विनयभंग केल्याची कबुली दिली. असाच एक गुन्हा त्याने समतानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत केला होता. त्याच्या अटकेने विनयभंगाच्या तीन गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले. तपासात मुख्तार हा आरे, मयुरनगरातील एका एसआरए इमारतीमध्ये राहत असून फिल्मलाईनमध्ये फ्लॅश लाईट मारण्याचे तसेच डिलीव्हरी बॉय म्हणून काम करतो. विनयभंगाच्या दोन्ही गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
विनयभंग करणारा मुख्तार हा सिरीयल गुन्हेगार असून त्याच्या अटकेने अशाच इतर काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. गुन्ह्यांतील बाईक, कपडे आणि इतर साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे. त्याचा ताबा लवकरच समतानगर पोलिसांना देण्यात येणार असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र आव्हाड यांनी सांगितले.