मंत्रालयातील कक्ष अधिकार्‍याला 6.37 लाखांच्या लाचप्रकरणी अटक

मूलभूत सुविधा विकास निधी मंजुरीसाठी लाचेची मागणी केली

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
5 एप्रिल 2026
मुंबई, – राज्याच्या एका मंत्र्याच्या स्विय सहाय्यकाला लाचेच्या गुन्ह्यांत अटक झाल्याची कारवाई ताजी असतानाच मंत्रालयातील एका कक्ष अधिकार्‍याला लाचप्रकरणी मुंबई युनिटच्या लाचलुचतप प्रतिबंधक विभागाने अटक केली. विलास ज्ञानोबा लाड असे या कक्ष अधिकार्‍याचे नाव असून त्याला 6 लाख 37 हजाराची लाच घेताना पकडण्यात आले. गावच्या मूलभूत सुविधांचे विकासकामासाठी निधी मंजूर करण्यासाठी लाचेची मागणी करणे विलास लाड यांना चांगलेच महागात पडले आहे. अटकेनंतर त्यांच्या घरी कारवाई करण्यात आली होती, मात्र या कारवाईचा तपशील समजू शकला नाही.

यातील तक्रारदार एका गावाचे मूलभूत सुविधांचे विकास कामासाठी शासकीय निधी मंजुर करण्याचे काम करतात. त्यासाठी त्यांना गावच्या सरपंचांनी अधिकारपत्र दिले होते. ते अधिकारपत्र घेऊन ते मंत्रालयात निधी मंजुरीसाठी गेले होते. मात्र त्यांच्या अर्जाची संबंधित विभागाकडून योग्य ती दखल घेतली जात नव्हती. वारंवार विचारणा करुनही त्यांना प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे त्यांनी मंत्रालयातील कक्ष अधिकारी विलास लाड यांची भेट घेतली होती. त्यांनी त्यांच्याकडे त्याचा अर्ज केला होता. या अर्जात गावच्या मूलभूत सुविधांचे विकास कामासाठी 25/15 आणि अल्पसंख्याक योजनेतंर्गत शासकीय निधी मंजुर करावे यासाठी विनंती करण्यात आली होती.

शासकीय निधी मंजुर करण्यासाठी विलास लाड यांनी त्यांच्याकडे 6 लाख 37 हजाराची मागणी केली होती. ही लाच दिल्याशिवाय निधी मंजुर होणार नाही असे त्यांना स्पष्टपणे सांगण्यात आले होते. मात्र त्यामुळे त्यांनी लाचेची रक्कम देण्याची तयारी दर्शवून 9 मार्चला विलास लाड यांच्याविरुद्ध मुंबई युनिट लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली हेती. या तक्रारीची 16 मार्चला शहानिशा करण्यात आली होती. यावेळी विलास लाड यांनी शासकीय निधी मंजुरीसाठी तक्रारदाराकडे 6 लाख 37 हजाराची मागणी केल्याचे उघडकीस आले होते.

ठरल्याप्रमाणे तक्रारदारांनी रविवारी त्यांना लाचेची रक्कम घेऊन येत असल्याचे सांगितले. यावेळी त्याने त्यांना नवी मुंबईतील खारघर परिसरात बोलाविले होते. तिथे गेल्यानंतर विलास लाड यांनी तक्रारदाराकडून लाचेची रक्कम घेतली होती. यावेळी या अधिकार्‍यांना त्यांना लाचेच्या रक्कमेसह रंगेहाथ पकडले. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्यांना मुंबई युनिट कार्यालयात आणण्यात आले.

त्यांच्याविरुद्ध कलम 7 भष्ट्राचार प्रतिबंधक अधिनियम 1988 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच गुन्ह्यांत त्यांना सोमवारी विशेष सेशन कोर्टात हजर केले जाणार आहे. विलास लाड हे मंत्रालयात क्लास वन कक्ष अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यामुळे त्यांना लाचेच्या गुन्ह्यांत अटक झाल्याने त्यांच्या सहकार्‍यांमध्ये एकच खळबळ उडाली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page