चोरी केलेल्या गॅस सिलेंडरची विक्री करणार्‍या टोळीचा पर्दाफाश

45 गॅस सिलेंडर, तीन बाईकसह आरोपीस अटक

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
5 एप्रिल 2026
मुंबई, – मुंबई, नवी मुंबई, ठाणे शहरातून चोरी केलेल्या गॅस सिलेंडरची विक्री करणार्‍या एका टोळीचा पवई पोलिसांनी पर्दाफाश केला. याच गुन्ह्यांत राज चंद्रकांत कांबळे या 45 वर्षांच्या आरोपीस पोलिसांनी अटक केली असून सध्या तो पोलीस कोठडीत आहे. राज हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध चोरीच्या दहाहून अधिक गुन्ह्यांची नोंद आहे. या कारवाईत पोलिसांनी चोरीचे 45 गॅस सिलेंडर आणि तीन बाईक जप्त केले आहेत. राजला मदत करणार्‍या दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते, चौकशीनंतर या दोघांनाही नोटीस देऊन सोडून देण्यात आल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सोनावणे यांनी सांगितले.

दोन वर्षांपूर्वी पवई पोलीस ठाण्यात एका बाईक चोरीच्या गुन्ह्यांची नोंद झाली होती. या बाईकचा शोध घेऊन आरोपीच्या अटकेसाठी पवई पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. तपासादरम्यान या चोरीच्या बाईकचा वापर करुन काहीजण मुंबईसह ठाणे, नवी मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी गॅस सिलेंडरची चोरी करत आहे. आखाती देशातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर समाजातील सर्व स्तरावरील लोकल गॅस सिलेंडरसाठी चिंतेत आहे. त्याचा फायदा घेऊन संबंधित आरोपी चोरीच्या गॅस सिलेंडरची चढ्या भावात विक्री करुन फसवणुक करत आहेत. याच दरम्यान अशाच गॅस सिलेंडरच्या चोरीच्या गुन्ह्यांची नोंद झाली होती. त्याची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत पवई पोलिसांना चौकशीचे आदेश दिले होते.

या आदेशानंतर अतिरिक्त पोलीस आयुक्त परमजीतसिंह दहिया, पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रदीप मैराळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सोनवणे, पोलीस निरीक्षक संजय बंडगर यांच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष कांबळे, पोलीस उपनिरीक्षक गणेश आव्हाड, पोलीस हवालदार तानाजी टिळेकर, मारोती सुरनर, आदित्य झेंडे, जयदेव चव्हाण, रमेश नलावडे, संदीप सुरवाडे, विशाल पिसाळ, पोलीस शिपाई सूर्यकांत शेट्टी, सदाशिव वारंग, संदीप राठोड, अर्जुन राठोड, प्रदीप शिरसाट यांनी तपास सुरु केला होता. तांत्रिक माहितीसह खबर्‍याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे या पथकाने राज कांबळे याला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.

चौकशीत राज हा ठाण्यातील वर्तकनगरमध्ये राहत असून त्यानेच काही बाईक चोरी केली होती. या चोरीच्या बाईकचा तो गॅस सिलेंडर चोरीसाठी वापर करत होता. गेल्या काही दिवसांत त्याने मुंबईसह ठाणे, नवी मुंबईतून गॅस सिलेंडर कर्मचारी असल्याचे भासवून मोठ्या प्रमाणात गॅस सिलेंडर चोरी केल्याची कबुली दिली. तपासात आलेल्या माहितीनंतर त्याला पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी चोरी केलेले 45 गॅस सिलेंडरसह तीन बाईक हस्तगत केले आहेत. राज हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे.

त्याच्या अटकेने पवईतील तीन, शिवाजी पार्क, कामाठे, पार्कसाईट पोलीस ठाण्यातील सहा तर इतर पोलीस ठाण्यातील चार असे दहा गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे. याकामी राजला इतर दोघांनी मदत केल्याचे उघडकीस आले. त्यामुळे या दोघांनाही पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीनंतर या दोघांनाही नोटीस देऊन सोडून देण्यात आले. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page