व्यावसायिकाच्या घरातून 1.16 कोटीच्या विविध दागिन्यांची चोरी
चोरीप्रकरणी तीन नोकरासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
5 एप्रिल 2026
मुंबई, – ताडदेव परिसरातील एका व्यावसायिकाच्या घरातून त्यांच्याच तीन नोकरांनी 1 कोटी 16 लाख रुपयांच्या विविध दागिन्यांची चोरी करुन त्याची परस्पर विक्री करुन फसवणुक केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी तिन्ही नोकरासह चोरीचे दागिने खरेदी करणार्या सोनार अशा चौघांविरुद्ध ताडदेव पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. नारायण भैरव पंडित, किशनकुमार सिंग, गणेश डोईफोडे आणि गणेश नर अशी या चौघांची नावे आहेत. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून या चारही आरोपींची लवकरच पोलिसांकडून चौकशी होणार आहे. या चौकशीनंतर त्यांच्यावर अटकेची कारवाई होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
59 वर्षांचे मनोज धनजीभाई सोलंकी हे त्यांच्या कुटुंबियांसोबत ताडदेव परिसरात राहत असून त्यांचा प्रॉपटी कन्सल्टीचा व्यवसाय आहे. त्यांच्याकडे नारायण पंडित आणि किशनकुमार हे दोघेही घरगडी म्हणून काम करत असून ते दोघेही मूळचे बिहारचे रहिवाशी आहेत. नारायण हा तेरा तर किशनकुमार हा गेल्या सहा वर्षांपासून त्यांच्याकडे काम करत होते. त्यांच्या लग्नात तसेच त्यांच्या पत्नीचे स्त्रीधन, वडिलोपार्जित विविध सोन्या-चांदी-प्लटिनमचे दागिने तयांनी त्यांच्या कपाटातील सेफ लॉकरमध्ये ठेवले होते. सणाच्या वेळेस ते दागिने बाहेर काढत होते, त्यानंतर ते दागिने पुन्हा सेफ लॉकरमध्ये ठेवत होते. अनेकदा साफसफाईसाठी ते कपाटातील चाची नारायण आणि किशनकुमार यांना देत होते. त्यांच्यावर त्यांचा प्रचंड विश्वास होता.
नोव्हेंबर 2025 रोजी त्यांच्या घरी लग्न समारंभ होते, त्यामुळे त्यांनी सेफ लॉकरमधून काही दागिने काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांना विविध सोन्या-चांदीचे दागिने मिसिंग असल्याचे दिसूनआले होते. याबाबत त्यांनी त्यांचा मुलगा यशकडे विचारणा केली होती, मात्र त्याला या दागिन्याविषयी काहीच माहिती नव्हती. त्यामुळे त्यांनी सर्व दागिन्यांची तपासणी केली होती. त्यात त्यांना सहा लाख रुपयांचे 60 ग्रॅम वजनाचे प्लटिनम, 20 लाख रुपयांचे 11 किलो 790 ग्रॅम वजनाचे चांदीचे तर 90 लाख रुपयांचे 770 ग्रॅम वजनाचे विविध सोन्याचे दागिने असा एक कोटी सोळा लाखांचा मुद्देमाल मिसिंग असल्याचे दिसून आले.
त्यांच्या घरी कुटुंबातील सदस्यासह दोन नोकर नारायण आणि किशनकुमार वगळता इतर कोणीही आले नव्हते. त्यामुळे त्यांना या दागिन्यांची चोरी त्यांच्याच दोन्ही नोकरानी केल्याचा संशय होता. त्यामुळे ते दोन्ही नोकराच्या हालचालीवर लक्ष ठेवून होते. याच दरम्यान त्यांना नारायण आणि किशनकुमार हे नेहमीच नवीन कपडे, महागडे वस्तू खरेदी करत असल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांच्यावर त्यांचा संशय अधिक बळावला होता. याच दरम्यान त्यांनी त्यांच्या बॅगेची तपासणी करुन त्यांच्या बँक स्टेटमेंटची पाहणी केली होती. त्यात त्यांना त्यांच्या बँक खात्यात आठ ते दहा लाख रुपयांचा आर्थिक व्यवहार झाल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांना या दागिन्यांच्या चोरीमागे या दोघांचा सहभाग असल्याचा संशय झाला होता.
याबाबत त्यांनी दोन्ही नोकराकडे चौकशी सुरु केली होती. चौकशीदरम्यान त्यांनी त्यांच्या कार्यालयातील गणेश डोईफोडे याच्या मदतीने त्यांनी दागिन्यांची चोरी केल्याची कबुली दिली. याकामी गणेशने त्यांना दागिने विक्री करण्यास मदत केली होती. चोरीचे दागिने गणेश नर या सोनाराकडे विक्री करत होता. त्यातून आलेली रक्कम ते तिघेही आपसांत वाटून घेत होते. या घटनेनंतर त्यांनी गणेश डोईफोडे याच्याकडे चौकशी केली होती. त्यानेही नारायण आणि किशनकुमार हे त्यांच्या घरातून टप्याटप्याने दागिन्यांची चोरी करत होते, या दागिन्यांची तो विक्री करुन त्यांना पैसे देत असल्याचे सांगितले.
गणेश नर या सोनारानेही त्यांनी गणेश डोईफोडे याच्याकडून दागिने विकत घेतल्याची कबुली दिली. त्यानंतर त्यांनी गणेश नरकडून दागिन्यांची यादी लिहून घेतली होती. 25 फेब्रुवारीपासून त्यांनी या दागिन्यांची चोरी करुन चोरीच्या दागिन्यांची विक्री केली होती. या तिन्ही नोकरांनी त्यांना चोरीचे दागिने तसेच दागिन्यांच्या विक्रीतून आलेली रक्कम परत करण्याचे आश्वासन दिले,
मात्र त्यांनी दागिने परत केले नाही किंवा पैसे परत दिले नाही. त्यामुळे त्यांनी संबंधित चारही आरोपीविरुद्ध ताडदेव पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यांनतर नारायण पंडित, किशनकुमार सिंग, गणेश डोईफोडे आणि गणेश नर या चौघांविरुद्ध पोलिसांनी चोरीसह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून या चौघांवर लवकरच अटकेची कारवाई होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.