वयोवृद्ध नागरिकांना टार्गेट करुन बोलबच्चन देऊन लुटमार
रेकॉर्डवरील तीन गुन्हेगारांना अटक करुन तेरा गुन्ह्यांची उकल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
5 एप्रिल 2026
मुंबई, – रस्त्यावरुन जाणार्या पादचार्यांना विशेषता वयोवृद्धांना टार्गेट करुन त्यांना शेठला मुलगा झाला आहे, मोफत साडी तसेच रेशन वाटप सुरु असल्याचे सांगून बोलबच्चन देऊन त्यांच्याकडील सोन्याचे दागिने पळविणार्या एका टोळीचा साकिनाका पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी रेकॉर्डवरील तीन गुन्हेगारांना पोलिसांनी शिर्डी आणि डोंबिवली परिसरातून अटक केली. संतोष गंगाराम चौरे, बालाजी रोहिदास पवार आणि लक्ष्मण रोहिदास पवार अशी या तिघांची नावे असून ते तिघेही अकोला आणि परभणीचे रहिवाशी आहेत. तिन्ही आरोपी रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्यांच्या अटकेने अशाच फसवणुकीच्या तेरा गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. या गुन्ह्यांतील सुमारे साडेपंधरा लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. अटकेनंतर या तिघांनाही लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
ऑलगा अॅण्टोनी जेकब ही 77 वर्षांची वयोवृद्ध महिला साकिनाका परिसरात तिच्या कुटुंबियांसोबत राहते. 24 मार्चला दुपारी एक वाजता ती मोहिली व्हिलेज पाईपलाईन, साईबाबा मंदिराजवळील मच्छिमार्केट परिसरातून जात होती. यावेळी तीन अज्ञात व्यक्तींनी तिच्याकडे येऊन त्यांच्या मालकांना मुलगा झाला आहे. त्यामुळे त्यांचे मालक गरीब महिलांना मोफत साडीचे वाटप करत आहे. तुम्हाला पण साडी मिळेल असे सांगून त्यांना गळ्यातील सोन्याचे दागिने काढण्यास सांगितले होते. त्यामुळे तिने तिचे सोन्याचे दागिने पिशवीत ठेवले होते. त्यानंतर या तिघांनी तिला बोलण्यात गुंतववून तिची पिशवी घेऊन पलायन केले होते. त्यात तिचे सोन्याचे दागिने आणि कॅश असा दोन लाख पाच हजार रुपये होते. हा प्रकार लक्षात येताच तिने साकिनाका पोलिसांना घडलेला प्रकार सांगून तिन्ही आरोपींविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी तिन्ही आरोपींविरुद्ध तोतयागिरी करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.
गेल्या काही महिन्यांत अशाच प्रकारच्या गुन्ह्यांत लक्षणीय वाढ झाली होती. त्यामुळे या गुन्ह्यांतील आरोपींच्या अटकेसाठी विशेष मोहीम घेण्याचे आदेश वरिष्ठांकडून संबंधित पोलिसांना देण्यात आले होते. या आदेशांनतर अतिरिक्त पोलीस आयुक्त परमजीतसिंह दहिया, पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रदीप मैराळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल यादव, पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र नागरे, पोलीस हवालदार दिपक कदम, रिक्की सौंदरमल, पोलीस शिपाई परेश शिगवण, विशाल थोरात, रेवनसिपद्ध ढगे, महिला पोलीस शिपाई विद्या आवटे, पोलीस हवालदार विशाल पिसाळ यांनी तपास सुरु केला होता.
परिसरातील सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरुन पोलिसांनी संतोष चौरेला डोबिवली येथील निवळी फाटा परिसरातून ताब्यात घेतले होते. चौकशीत त्याचा या गुन्ह्यांत सहभाग उघडकीस आला होता. याकामी त्याला त्याला बालाजी पवार आणि लक्ष्मण पवार या दोघांनी मदत केली होती. त्यानंतर या दोघांनाही शिर्डी येथून अहिल्यानगर येथून पोलिसांनी ताब्यात घेतले होते. चौकशीत संतोष चौरे हा अकोला येथील जनता बाजार झोपडपट्टी परिसरात राहत असून मजुरीचे काम करतो. या गुन्ह्यांतील तो मुख्य आरोपी असून त्याच्याविरुद्ध वरळी पोलीस ठाण्यात चार, दादर पोलीस ठाण्यात दोन, घाटकोपर पोलीस ठाण्यात सात, एमआयडीसी पोलीस ठाण्यात तीन, कांजूरमार्ग पोलीस ठाण्यात चार, वाकोला, दिडोंशी, मालाड, गोवंडी, भांडुप, खेरवाडी पोलीस ठाण्यात प्रत्येकी एक अशा 26 गुन्हे दाखल आहेत.
बालाजी आणि लक्ष्मण हे दोघेही बंधू असून ते परभणीच्या गंगाखेडचे रहिवाशी असून सध्या कल्याणच्या नेवाळी फाटा मंदिराजवळ राहतात. ते दोघेही बेरोजगार असून संतोष चौरे याच्योबत अशाच प्रकारचे गुन्हे करतात. यातील बालाजीविरुद्ध दादर, डी. बी मार्ग, कामोठे आणि लक्षम्णविरुद्ध दादर, घाटकोपर आणि कामोठे पोलीस ठाण्यात प्रत्येकी तीन गुन्ह्यांची नोंद आहे. ही टोळी रस्त्यावर जाणार्या पादचार्यांना विशेषता वयोवृद्धांना टार्गेट करुन त्यांच्या शेठला मुलगा झाला आहे, साडी व रेशन वाटप सुरु आहे असे बोलबच्च देऊन त्यांची ुसवणुक करतात. तिन्ही आरोपी रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्यांच्याविरुद्ध मुंबई, नवी मुंबईत अनेक गुन्हे दाखल आहेत.
त्यांच्या अटकेने मुंबईसह नवी मुंबईतील अॅण्टॉप हिल, घाटकोपर, भायखळा, ना. म जोशी मार्ग, दिडोंशी, जुहू, श्रीनगर, सानपाडा, साकिनका आदी विविध पोलीस ठाण्यातील तेरा गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. या गुन्ह्यांतील 15 लाख 46 हजार 250 रुपयांचे 123 ग्रॅम वजनाचे विविध सोन्याचे दागिने मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. अटकेनंतर या तिघांनाही लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. त्यांचा इतर गुन्ह्यांत सहभाग उघडकीस आल्याने त्यांचा ताबा इतर पोलिसांना देण्यात येणार आहे.