अनैतिक संबंधातून पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीला चाकूने भोसकले
पत्नीला अटक तर मामाचा मुलगा असलेला प्रियकर पळून गेला
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
5 एप्रिल 2026
मुंबई, – अनैतिक संबंधातून झालेल्या वादातून एका व्यक्तीवर त्याच्याच पत्नीने चाकूने भोसकल्याची घटना गोवंडीतील बैंगनवाडीत घडली. या हल्ल्यात सुलेमान सईद बाबा नावाचा व्यक्ती गंभीररीत्या जखमी झाला असून त्याच्यावर सायन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी सुलेमानची पत्नी फातिमा सुलेमान बाबा आणि मामाचा मुलगा असलेला प्रियकर शोएब सलीम सय्यद यांच्याविरुद्ध हत्येचा प्रयत्नासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याच गुन्ह्यांत फातिमाला शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली असून ती सध्या पोलीस कोठडीत आहे. शोएब हा पळून गेल्याने त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
38 वर्षांचे सुलेमान हा गोवंडीतील बैंगनवाडीत राहता असून बिगारी कामगार म्हणून काम करतो. शोएब हा त्याचा मामाचा मुलगा असून तो बांधकामाचे कॉन्ट्रक्ट घेतो. त्याच्याकडे सुलेमान हा गेल्या दिड वर्षांपासून कामाला आहे. त्याच्या पहिल्या पत्नीचे निधन झाले होते, त्यामुळे फातिमाशी आठ महिन्यांपूर्वी विवाह केला होता. गेल्या काही दिवसांपासून त्याच्या घरी तो कामावर गेल्यानंतर एक व्यक्ती येत असल्याची माहिती स्थानिक रहिवाशांकडून मिळाली होती. मात्र त्याकडे त्याने दुर्लक्ष केले होते.
3 एप्रिलला तो शोएबच्या सांगण्यावरुन शिवाजीनगर परिसरात बिगारीचे काम करण्यासाठी गेला होता. यावेळी त्याला सिमेंट ट्रॉलीला चैनीने कुलूप लावून बंद केले असून त्याची चावी घरी असल्याचे लक्षात आले. त्यामुळे तो चावी घेण्यासाठी घरी गेला होता. यावेळी त्याला त्याचे घर बंद दिसले, बाहेर एका व्यक्तीची चप्पल होती. त्यामुळे त्याने दरवाज्याच्या फटीने आत डोकावून पाहण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्याची पत्नी फातिमा आणि शोएब यांच्यात शारीरिक संबंध सुरु असल्याचे दिसून आले. ते पाहिल्यानंतर त्याचा राग अनावर झाला आणि त्याने जोरात दरवाजा ठोठावला होता. त्यानंतर त्याच्या पत्नीने दरवाजा उघडला.
यावेळी शोएब हा रुममध्ये लपवून बसला होता. त्याने त्याला बेदम मारहाण केली. त्यानंतर शोएब तेथून पळून गेला. हा प्रकार नंतर सुलेमानने त्याच्या नातेवाईकांना सांगून शोएबबाबत तक्रार केली होती. शोएब हा त्यांचा नातेवाईक होता. त्याने फातिमाने शोएबला घरी बोलाविले होते. त्याने सुलेमानला घरी बोलावून बोलायचे आहे असे सांगितले. त्यामुळे रात्री पावणेबारा वाजता तो घरी गेला होता. यावेळी घरी त्याची पत्नी, शोएब आणि सासू असे सर्वजण होते. चर्चेदरम्यान त्यांच्यात पुन्हा शाब्दिक बाचाबाची झाली होती. रागाच्या भरात शोएबने त्याला जिवे मारण्याची धमकी दिली होती.
या धमकीनंतर काही कळण्यापूर्वीच शोएबने त्याच्यावर चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. याच दरम्यान शोएबने त्याला पकडले तर फातिमाने त्याच्या पोटात चाकूने भोसकले. त्यानंतर तिने त्याच्या पायावर चाकूने वार केले. रक्तबंबाळ अवस्थेत त्याने फातिमाला लाथ मारली आणि स्वतची सुटका करण्यासाठी घरातून पळ काढला. जखमी झालेल्या सुलेमानला त्याच्या नातेवाईकासह स्थानिक रहिवाशांनी तातडीने गोवंडीतील शताब्दी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला नंतर सायन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तिथेच त्याच्यावर उपचार सुरु आहे.
ही माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी सुलेमानची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली होती. या जबानीनंतर त्याची पत्नी फातिमा आणि मामाचा मुलगा शोएब याच्याविरुद्ध हत्येचा प्रयत्नासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच आरोपी पत्नी फातिमाला पोलिसांनी अटक केली तर पळून गेलेल्या शोएबचा पोलीस शोध घेत आहेत. अटकेनंतर फातिमाला दुसर्या दिवशी लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.