पोलीस दलातील निवृत्त झालेल्या एसीपीसह दोन मुलांची फसवणुक
आकर्षक व्याजाच्या आमिषाने अनेकांना ९८ लाखांचा गंडा घातला
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२० एप्रिल २०२४
मुंबई, – मुंबई पोलीस दलातून सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून निवृत्त झालेल्या एका पोलीस अधिकार्यासह त्याच्या दोन मुलांची फसवणुक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या टोळीने आकर्षक व्याजासह विविध गुंतवणुक योजनाच्या आमिषाने अनेकांना सुमारे ९८ लाखांना घातला आहे. याप्रकरणी कुबेर डिझीटल मार्केटिंग कंपनीच्या तिन्ही संचालकाविरुद्ध एमआयडीसी पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून असून पळून गेलेल्या या तिन्ही संचालकांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. सबिरसिंग, भाविन शहा आणि प्रमोद गांगुर्डे अशी या तिघांची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले.
६१ वर्षांचे तक्रारदार मुंबई पोलीस दलातून सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून निवृत्त झाले असून ते सध्या पुण्यातील कोथरुड परिसरात त्यांच्या कुटुंबियांसोबत राहतात. भाविन शहा हा त्यांचा मित्र असून ते त्याला गेल्या वीस वर्षांपासून ओळखतात. मार्च २०२० रोजी तो त्यांना भेटण्यासाठी त्यांच्या कार्यालयात आला होता. यावेळी भाविनने त्यांची ओळख जसबीरसिंग आणि प्रविण गांगुर्डे यांच्याशी करुन दिली होती. या तिघांनी एक नॉन बँकिग कंपनीची स्थापना केली होती. त्याचे नाव कुबेर इन्व्हेसमेंट ऍण्ड प्रॉपर्टीज असे होते. त्यांचे कार्यालय अंधेरीतील तुंगा हाटेलजवळील महाराष्ट्र औद्यागिक विकास महामंडळाच्या इमारतीमध्ये होते. नंतर त्यांनी त्यांचे कार्यालय निरमा प्लाझा येथे हलविले होते. त्यांनी त्यांच्या कंपनीतील गुंतवणुकीवर अनेक आकर्षक योजना सुरु केल्या होत्या. त्यामुळे त्यांनीही त्यांच्या कंपनीत गुंतवणुक करावी, त्यांना ३६ महिन्यांच्या गुंतवणुकीवर आकर्षक व्याजदर देण्याचे आश्वासन दिले होते. कंपनी शेअरसह जमिनीच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार करत असून त्यातून आलेला फायदा कंपनी त्यांच्या गुंतवणुकदारांना देते. कंपनीने विविध ठिकाणी स्वस्तात अनेक प्लॉट खरेदी केले आहेत. या प्लॉटचे सात बारा काही गुंतवणुकदारांच्या नावावर केले असून लवकरच ते प्लॉट विकसित करुन तिथे गुंतवणुदारांना स्वस्तात फ्लॅट देण्याचे आमिष दाखविले होते. गुंतवणुकीसाठी या तिघांनी आवश्यक असलेले सर्व शासकीय परवाने घेतल्या होत्या. तसेच कंपनीकडून रिझर्व्ह बँकेच्या सर्व नियमांचे पालन असल्याचे चित्र गुंतवणुकदारांना दाखविण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांनी त्यांच्या कंपनीत गुंतवणुकीचा निर्णय घेतला होता.
सप्टेंबर २०२० ते एप्रिल २०२२ या कालावधीत त्यांच्यासह त्यांचा मुलगा आणि मुलगी अशा तिघांनी सुमारे ७५ लाखांची गुंतवणुक केली होती. या गुंतवणुकीवर त्यांना नियमित व्याजाची रक्कम मिळत होती. ऑक्टोंबर २०२१ रोजी कंपनीच्या वतीने लोणावळा येथील एका रिसॉर्टमध्ये गुंतवणुकदारासह हिंतचिंतक, मित्र परिवारासाठी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याच कार्यक्रमांत त्यांच्या मुलीला कंपनीतर्फे एक सुझुकी कार बक्षिस म्हणून देण्यात आली होती. काही महिन्यानंतर कंपनीने त्यांच्या गुंतवणुकदारांना व्याजाची रक्कम देणे बंद केले होते. त्यांच्या मुलीला बक्षिस म्हणून देण्यात आलेली कार लोन घेऊन देण्यात आली होती. त्याचे हप्तेही कंपनीने देणे बंद केले होते. हा प्रकार उघडकीस येताच काही गुंतवणुकदारांनी त्यांच्या कार्यालयात धाव घेतली होती. यावेळी या तिघांनी भाड्याने घेतलेले कार्यालय बंद करुन पलायन केल्याचे अनेकांना निदर्शनास आले होते. चौकशीदरम्यान कंपनीने गुंतवणुकीसाठी आवश्यक कुठल्याही परवानग्या घेतल्या नव्हता. गुंतवणुकदाराकडून घेतलेले टीडीएसचे पैसे शासनाला जमा केले नव्हते. अशा प्रकारे त्यांनी शासनाची फसवणुक केली होती. कंपनीने गुंतवणुकदारासाठी एक व्हॉटअप ग्रुप बनविला होता. त्यात २० ते २२ सभासदाचा समावेश होता. या सर्वांना विविध आमिष दाखवून कंपनीत गुंतवणुक करण्यास प्रवृत्त करण्यात आले होते. मात्र त्यापेकी कोणालाही मुद्दलसह व्याजाची रक्कम देण्यात आली नव्हती. कंपनीने नाशिकच्या खर्डी परिसरात मोठा प्लॉट विकत घेतला होता, या प्लॉटची विक्री करुन सर्व गुंतवणुकदाराची देणी परत करणार असल्याचे आश्वासन दिले. मात्र त्यांनी त्यांचे आश्वासन पाळले नाही.
काही महिन्यानंतर त्यांनी ही कंपनी बंद करुन दुसरी कंपनी सुरु केली होती. या कंपनीत त्यांनी अशाच प्रकारे आकर्षक व्याजदर योजना सुरु करुन अनेकांना गंडा घातला होता. या कंपन्यांनी मुंबईसह राज्यातील विविध शहरात अनेकांना कंपनीत गुंतवणुक करण्यास प्रवृत्त करुन फसवणुक केल्याचे उघडकीस आले आहे. कंपनीने तक्रारदारासह त्यांच्या दोन मुलांची तसेच इतरांची सुमारे ९८ लाखांची फसवणुक केल्याचे निष्पन्न झाले असले तरी फसवणुकीचा हा आकडा त्यापेक्षा अधिक असल्याचे बोलले जाते. त्यामुळे त्यांनी एमआयडीसी पोलिसांना घडलेला प्रकार सांगून तिन्ही संचालकाविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर जसबिरसिंग, भाविन शहा आणि प्रमोद गागुर्डे यांच्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुक आणि अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.