2.82 कोटीच्या हिर्यांचा अपहार करुन हिरे व्यापार्याची फसवणुक
राजस्थानच्या हिरे व्यापारी पिता-पूत्राविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
7 एप्रिल 2026
मुंबई, – विक्रीसाठी घेतलेल्या 2 कोटी 82 लाख रुपयांच्या हिर्यांचा अपहार करुन एका हिरे व्यापार्याची पिता-पूत्रांनी फसवणुक केल्याची घटना वांद्रे येथील बीकेसी परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी आरोपी पिता-पूत्रांविरुद्ध बीकेसी पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. राजेंद्र खंडेलवाल, अभिषेक राजेंद्र खंडेलवाल आणि रविंद्र राजेंद्र खंडेलवाल ऊर्फ रवी अशी या तिघांची नावे असून ते तिघेही मूळचे राजस्थानचे रहिवाशी आहेत. त्यांच्या अटकेसाठी एक टिम लवकरच राजस्थानला जाणार आहेत.
चेतन पोपटलाल सल्ला हे हिरे व्यापारी असून ते वाळकेश्वर परिसरात राहतात. त्यांची रिद्धी-सिद्धी एक्सपोर्ट नावाची एक कंपनी असून या कंपनीचे एक कार्यालय वांद्रे येथील बीकेसी भारत डायमंड बोर्समध्ये आहे. ही कंपनी हिर्यांची खरेदी-विक्री करते. अकरा वर्षांपूर्वी त्यांची 65 वर्षांचे राजेंद्र खंडेलवालशी ओळख झाली होती. राजेंद्र हा राजस्थानच्या जयपूरचा रहिवाशी असून अभिषेक आणि रविंद्र हे त्याची मुले आहेत. त्याचाही हिरे खरेदी-विक्रीचा व्यवसाय होता. या व्यवसायात त्याला त्याचे दोन्ही मुले मदत करत होते.
राजस्थानमध्ये त्याचे अनेक परिचित हिरे व्यापारी असून त्यांच्या हिर्यांना राजस्थानात चांगली किंमत मिळवून देतो असे सांगून त्यांनी त्यांचा विश्वास संपादन केला होता. त्यानंतर त्यांच्यात हिर्यांचा खरेदी-विक्रीचा व्यवहार सुरु झाला होता. दोन वर्षांत त्याने चेतन सल्ला यांच्याकडून अनेकदा हिरे घेतले होते, या हिर्यांचे पेमेंट वेळेवर देऊन त्याने त्यांचा विश्वास संपादन केला होता. अनेकदा उशिराने पेमेंट केले जात होते, मात्र त्यांच्याकडून पेमेंट मिळत असल्याने त्यांनी राजेंद्र व त्याचे दोन मुले रविंद्र आणि अभिषेक यांच्याशी व्यवहार सुरुच ठेवला होता.
2017 ते 2018 या दोन वर्षांत त्यांनी या पिता-पूत्रांना 2 कोटी 82 लाख 44 हजार रुपयांचे हिरे विक्रीसाठी दिले होते. मात्र सात वर्ष उलटूनही त्यांनी या हिर्यांचे पेमेंट केले नव्हते किंवा विक्रीसाठी दिलेले हिरे परत केले नाही. याबाबत त्यांनी त्यांच्याकडे सतत पाठपुरावा केला होता. मात्र त्यांच्याकडून त्यांना प्रतिसाद मिळत नव्हता. संबंधित व्यापारी बाहेरगावी आहे, हॉस्पिटलमध्ये आहे म्हणून पेमेंट मिळत नाही असे सांगून त्यांना टाळण्याचा प्रयत्न करत होते. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून राजेंद्र हा आर्थिक अडचणीत असल्याचे सांगून पेमेंटसाठी विलंब होत असल्याचे सांगत होता.
मात्र पेमेंट करतो असे सांगून त्याने त्यांच्या हिर्यांचे पेमेंट केले नाही. नंतर त्याने त्यांचे कॉल घेणे बंद केले होते, त्यांचे कॉल ब्लॉक केले होते. या पिता-पूत्रांनी विक्रीसाठी घेतलेल्या हिर्यांचा अपहार करुन त्यांची फसवणुक केली होती. हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी या तिघांविरुद्ध बीकेसी पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर राजेंद्र खंडेलवाल व त्याचे दोन मुले अभिषेक आणि रविंद्र खंडेलवाल यांच्याविरुद्ध हिर्यांचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
या गुन्ह्यांचा तपास सुरु असून आरोपींच्या अटकेसाठी बीकेसी पोलिसांची एक टिम लवकरच राजस्थानला जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. खंडेलवाल पिता-पूत्राने अशाच प्रकारे इतर काही हिरे व्यापार्यांची फसवणुक केली आहे का याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.