हत्येच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यांतील आरोपीचे सेशन कोर्टातून पलायन
आरोपीच्या अटकेसाठी स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेची मोहीम
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
8 एप्रिल 2026
मुंबई, – हत्येच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यांतील एका आरोपीने सेशन कोर्टातून पोलीस शिपायाच्या हातावर जोरात फटका देऊन बेडीसह पलायन केल्याची घटना उघडकीस आली आहे. हरिसन अॅन्थोनी जोसेफ असे या 42 वर्षीय आरोपीचे नाव असून त्याच्या अटकेसाठी स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. दरम्यान कायदेशीर रखवालीतून पलायन केल्याप्रकरणी हरिसन जोसेफ याच्याविरुद्ध कुलाबा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दुपारी सेशन कोर्टाने बेडीसह पलायन केल्याने तिथे उपस्थित पोलिसांमध्ये प्रचंड खळबळ उडाली होती.
हरिसन जोसेफ हा क्रॉफर्डमार्केट येथील मुसाफिरखाना, न्यू संकेत इमारतीमध्ये राहत होता. तो सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध अनेक गुन्हे दाखल आहेत. मार्च 2024 रोजी क्षुल्लक वादातून राजू शेख या पिशव्या विक्रेत्यावर तिघांनी एअरगनने गोळीबार केला होता. त्यात राजू हा गंभीररीत्या जखमी झाला होता. या गुन्ह्यांत संबंधित तिघांविरुद्ध पोलिसांनी हत्येचा प्रयत्नासह शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत नंतर पळून गेलेल्या दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. मात्र हरिसन हा पळून गेला होता. त्याचा शोध सुरु असताना त्याला जानेवारी 2025 रोजी पोलिसांनी अटक केली होती. या आरोपींविरुद्ध नंतर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली होती.
याच गुन्ह्यांत तो आर्थर रोड कारागृहात न्यायालयीन कोठडीत होता. मंगळवारी दुपारी हरिसनसह इतर आरोपींना पुढील सुनावणीसाठी विशेष सेशन कोर्टात हजर करण्यात आले होते. कोर्ट क्रमांक दहामध्ये त्याची पूर्ण झाली होती. मात्र इतर चार आरोपींची सुनावणी बाकी असल्याने त्याला पोलीस शिपाई प्रशांत श्रीमंत कांबळे हे लॉकअपमध्ये घेऊन जात होते. तिसर्या मजल्यावरुन दुसर्या मजल्यावर जाताना हरिसनने अचानक पोलीस शिपई प्रशांत कांबळे यांच्या हातावर जोरात फटका मारला आणि तो बेडीसह कोर्टातून पळून गेला होता. या घटनेनंतर त्याचा तिथे उपस्थित पोलिसांनी सर्वत्र शोध घेतला, मात्र तो कुठेच सापडला नाही.
तो पळून गेल्याचे खात्री होताच प्रशांत कांबळे यांच्या तक्रारीवरुन कुलाबा पोलिसांनी हरिसन जोसेफविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. मंगळवारी दुपारी सेशन कोर्टातून आरोपी पळून गेल्याने त्याची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेला संमातर तपास करुन आरोपीच्या अटकेचे आदेश दिले होते. हरिसन हा मूळचा केरळचा रहिवाशी असून मुंबईतून तो त्याच्या केरळ येथील गावी पळून जाण्याची शक्यता असल्याने त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. सीएसएमटी, लोकमान्य टिळक टर्मिनस, कुर्ला आदी रेल्वे स्थानकात पोलीस टिम पाठविण्यात आली होती.