गाड्या खरेदी-विक्रीच्या बिलांमध्ये फेरफार करुन 43 लाखांची फसवणुक

फसवणुकप्रकरणी कंपनीच्या जनरल मॅनेजरविरुद्ध गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
10 एप्रिल 2026
मुंबई, – गाड्या खरेदी-विक्रीच्या बिलांमध्ये फेरफार करुन कंपनीची सुमारे 43 लाखांची आर्थिक फसवणुक झाल्याचा प्रकार कांदिवली परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी नितीन पुंडलिक सावंत या कंपनीच्या जनरल मॅनेजरविरुद्ध कांदिवली पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. नितीनने बिलांमध्ये फेरफार करुन गेल्या अडीच वर्षांत 68 लाखांची फसवणुक केली असून त्यापैकी 25 लाख रुपये कंपनीत जमा केले आहे. उर्वरित 43 लाख रुपयांचा परस्पर अपहार करुन कंपनीची फसवणुक केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. त्याचा पोलिसाकडून शोध सुरु आहे. याच गुन्ह्यांत त्याची पत्नी निशा सावंत हिचीही पोलिसाकडून चौकशी होणार आहे.

भाविक कल्पित पारेख हे बोरिवली परिसररात राहत असून कांदविलीतील एका खाजगी कंपनीत वरिष्ठ अधिकारी म्हणून काम करतात. ही कंपनी विविध नामांकित कंपन्यांचे जुन्या कार खरेदी करुन नंतर या कारची विक्री करते. याच कंपनीत कांदिवलीतील लालजीपाड्याचा रहिवाशी असलेला नितीन सावंत हा गेल्या पाच वर्षांपासून जनरल मॅनेजर म्हणून काम करत होता. नोव्हेंबर 2025 रोजी कंपनीत ऑडिट झाले होते. त्यात ऑडिटरला गाड्याच्या खरेदी-विक्रीच्या बिलांमध्ये प्रचंड तफावत असल्याचे दिसून आले होते. संपूर्ण व्यवहाराची तपासणी केल्यानंतर त्यांना नितीन सावंत व त्याची पत्नी निशा सावंत यांच्या बँक खात्यात कंपनीतून सुमारे 68 लाख रुपयांचा व्यवहार झाल्याचे उघडकीस आले होते.

चौकशीदरम्यान दोन गाड्यांचा व्यवहार झाला असताना नितीनने एका गाडीचा व्यवहार दाखविला होता. बिलांमध्ये मोठ्या प्रमाणात फेरफार करुन त्याने स्वतसह त्याच्या पत्नीचया बँक खात्यात व्यवहाराचे पैसे ट्रान्स्फर केले होते. त्यासाठी त्याने काही परिचित ब्रोकरच्या मदतीने कंपनीचे बोगस गेट पास आणि डिलीव्हरी नोट बनविले होते. त्यात ड्रिम मोटर्स आणि आरहम मोटर्सच्या काही ब्रोकरचा समावेश होता. गेल्या अडीच वर्षांत नितीनने हा संपूर्ण गैरव्यवहार करुन कंपनीची 68 लाखांची फसवणुक केली होती.

हा प्रकार उघडकीस येताच भाविक पारेख यांनी नितीन सावंतकडे खुलासा मागितला होता. त्यात त्याने कंपनीत गैरव्यवहार केल्याची कबुली देताना कंपनीत ही रक्कम जमा करण्याचे आश्वासन दिले होते. ठरल्याप्रमाणे त्याने दोन दिवसांत कंपनीच्या बँक खात्यात 25 लाख रुपये ट्रान्स्फर केले. मात्र उर्वरित 43 लाख रुपये कंपनीला परत केले नाही. वारंवार विचारणा करुनही त्याच्याकडून त्यांना काही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्याला कंपनीतून काढून टाकण्यात आले होते. त्यानंतर कंपनीच्या वतीने भाविक पारेख यांनी कांदिवली पोलिसांत तक्रार केली होती.

या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर नितीन सावंत याच्याविरुद्ध गाड्यांच्या खरेदी-विक्रीच्या बिलांमध्ये मोठ्या प्रमाणात फेरफार करुन कंपनीची 43 लाखांची आर्थिक फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा पोलिसांकडून तपास सुरु आहे. याच गुन्ह्यांत नितीन सावंत व त्याची पत्नी निशा सावंत यांची पोलिसांकडून लवकरच चौकशी होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page