कार पार्क करण्यावरुन झालेल्या वादातून वयोवृद्धाची हत्या
हत्येनंतर दोन्ही मारेकर्याचे घटनास्थळाहून पलायन
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
14 एप्रिल 2026
मुंबई, – पार्क करण्यावरुन झालेल्या वादातून नरेश ऊर्फ नरोत्तम बाला वाघेला या 63 वर्षांच्या वयोवृद्धाची दोन अज्ञात व्यक्तीने लाथ्याबुक्यांनी बेदम मारहाण करुन हत्या केल्याची घटना दादर परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी माटुंगा पोलिसांनी दोन्ही मारेकर्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. परिसरातील सीसीटिव्ही फुटेजच्या मदतीने पळून गेलेल्या मारेकर्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
सविता नरोत्तमबाला वाघेला ही 45 वर्षांची महिला घरकाम करत असून सध्या दादर येथील दादर टी टी सर्कल ब्रिजखाली राहते. तिचे नरेशसोबत दुसरा विवाह झाला आहे. तिचे आधीचे नाव सविता शंकर शिंदे असून या लग्नाबाबत तिच्याकडे कोणतेही कागदपत्रे नाही. नरेश हा मनपाच्या कचरा वाहून नेणार्या गाडीवर काम करतो. रविवारी रात्री साडेनऊ वाजता तिच्या घराजवळ एका अज्ञात व्यक्तीने त्याची कार पार्क केली होती. यावेळी मद्यप्राशन केलेल्या नरेशने चालकाला तिथे कार पार्क करु नकोस असे सांगितले होते, तरीही त्याने तिथेच त्याची कार पार्क केली होती.
याच कारणावरुन या चालकासह त्याच्या मित्राने नरेशसोबत वाद घालण्यास सुरुवात केली होती. वादाचे पर्यावसान हाणामारीत होऊन या दोघांनी नरेशला शिवीगाळ करुन लाथ्याबुक्यांनी बेदम मारहाण केली होती. मारहाणीनंतर नरेशने त्यांना आईवरुन शिवीगाळ केली होती. त्यामुळे त्याचा राग आल्याने या दोघांनी त्याला बेशुद्ध होईपर्यंत मारहाण केली होती. त्यानंतर ते दोघेही तेथून पळून गेले होते. मारहाणीत नरेश हा बेशुद्ध पडल्याने त्याला सवितासह इतर लोकांनी तातडीने जवळच्या केईएम हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच माटुंगा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.
याप्रकरणी सविताकडून घडलेला प्रकार समजताच पोलिसांनी तिच्या तक्रारीवरुन दोन्ही आरोपीविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. हत्येनंतर दोन्ही आरोपी पळून गेल्याने त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. परिसरातील सीसीटिव्ही फुटेजच्या मदतीने संबंधित कारसह चालक व त्याच्या सहकार्याचा शोध घेतला जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.