गावी गेलेल्या महिलेच्या घरी चोरट्याची हातसफाई

सुमारे सतरा लाखांचे दागिने घेऊन आरोपीचे पलायन

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
14 एप्रिल 2026
मुंबई, – मुलाला कॉलेजला सुट्टी असल्याने गावी गेलेल्या महिलेच्या घरात प्रवेश करुन एका अज्ञात चोरट्याने हातसफाई केल्याची घटना कांदिवली परिसरात उघडकीस आहे. या चोरट्याने हॉलमधील कपाटातून सुमारे सतरा लाख वीस हजार रुपयांचे सोन्याचे विविध दागिने चोरी करुन पलायन केले आहे. याप्रकरणी चारकोप पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा नोंदवून पळून गेलेल्या आरोपीचा शोध सुरु केला आहे.

ही घटना रविवारी सकाळी पाच ते पावणेसहाच्या सुमारास कांदिवलीतील चारकोप, सेक्टर क्रमांक आठ, माऊलीकृपा सोसायटीमध्ये घडली. याच सोसायटीमध्ये मोहीनी श्रीकृष्ण चौधरी ही महिला तिचा मुलगा कौस्तुभसोबत राहते. तिचे पती श्रीकृष्ण चौधरी हे ओमान देशात ड्रिलिंग मॅनेजर म्हणून कामाला असून तीन महिन्यातून ते पंधरा दिवसांसाठी मुंबईत येतात. तिच्या मुलाला कॉलेजला सुट्टी असल्याने ती तिच्या मुलासोबत 10 एप्रिलला तिच्या सिंधुदुर्गच्या वैभववाडीतील गावी गेली होती. तिच्या घरातील टेरेसवर झाडे असल्याने तिने शेजारी राहणार्‍या श्रद्धा अमीत यादव या महिलेस पाणी घालण्यास सांगितले होते.

त्यासाठी तिने घरातील एक चावी तिच्याकडे दिली होती. मात्र तिच्या घरात कोणीही नसल्याची संधी साधून अज्ञात व्यक्तीने घरातील कुलूप तोडून आत प्रवेश केला होता. कपाटातील सतरा लाख वीस हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी करुन या चोरट्याने पलायन केले होते. 12 एप्रिलला तिने तिने तिच्या मोबाईलवर घरातील सीसीटिव्ही कॅमेर्‍याचे फुटेजची पाहणी केली होती. त्यात तिला तिच्या घरात एका तरुणाने प्रवेश केल्याचे दिसून आले. हॉलमध्ये प्रवेश करुन कपाटातील दागिने चोरी केले होते.

सकाळी पावणेसहा वाजता तो तिच्या घरातून निघून गेला होता. हा प्रकार दिसताच ती गावाहून मुंबईत आली होती. घरात प्रवेश केल्यानंतर तिला सर्व सामान अस्ताव्यस्त पडल्याचे दिसून आले. कपाटाची पाहणी केल्यानंतर विविध सोन्याचे दागिने चोरट्याने पळविल्याचे दिसून आले. त्यानंतर तिने घडलेला प्रकार चारकोप पोलिसांना सांगितला. तिच्या तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे.

घरासह परिसरातील सीसीटिव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून या फुटेजच्या मदतीने पळून गेलेल्या आरोपीच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. दरम्यान रविवारी सकाळी उघडकीस आलेल्या या घरफोडीच्या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page