ड्रग्जमुळे दोघांचा झालेल्या मृत्यूप्रकरणी सहाजणांना अटक

पोलीस अ‍ॅक्शन मोडवर; इतर आरोपी पोलिसांच्या रडारवर

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
14 एप्रिल 2026
मुंबई, – शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या गोरेगाव येथील नेस्को सेंटरमधील संगीत कार्यक्रमाच्या लाईव्ह कॉर्न्स्टमध्ये मद्यप्राशनासह ड्रग्जचा ओव्हरडेास घेतल्यानंतर दोघांचा झालेल्या मृत्यूनंतर आता वनराई पोलीस अ‍ॅक्शन मोडवर आली होती. याप्रकरणी भारतीय न्याय सहिता, महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम आणि एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच सोमवारी वेगवेगळ्या परिसरातून सहाजणांना पोलिसांनी अटक केली. रौनक राहुल खंडेलवाल, विहान ऊर्फ आकाश बनमारी सामल, सनी विनोद जैन, बालकृष्णन बलराम कुरुप, प्रतिक बिजेश पांडे आणि आनंद लक्ष्मण पटेल अशी या सहाजणांची नावे आहेत. अटकेनंतर या सर्वांना बोरिवलीतील लोकल कोर्टाने गुरुवार 16 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत इतर आरोपी पोलिसांच्या रडारवर असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी शोधमोहीम सुरु आहे. कार्यक्रमांत मद्य आणि ड्रग्ज नेण्यात आले होते, त्यात आयोजकासह सुरक्षारक्षकांनी प्रचंड हलगर्जीपणा केल्याचे तपासात उघड झाले आहे. त्यामुळे या सर्वांविरुद्ध भक्कम पुरावे गोळा करण्यावर पोलिसांनी भर दिला आहे.

शनिवारी सायंकाळी गोरेगाव येथील वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, नेस्को सेंटरमध्ये एका हायफाय संगीत लाईव्ह कॉर्न्स्ट आयोजित करण्यात आला होता. या कॉर्न्स्टमध्ये तीन ते चार हजार तरुण-तरुणी सामिल झाले होते. कार्यक्रम सुरु असताना काही तरुणांची प्रकृती बिघडली होती. त्यामुळे त्यापैकी तिघांना जोगेश्वरीतील ट्रॉमा केअर आणि गोरेगाव येथील लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. ही माहिती प्राप्त होताच वनराई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. ट्रॉमा केअर हॉस्पिटलमध्ये शीतल साळवी आणि श्रेया राय या दोघांवर उपचार सुरु होते. मात्र त्या दोघीही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हते. दुसरीकडे लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये उपचार घेणार्‍या बिस्मातसिंह अमरजीतसिंह भसीन या 28 वर्षांच्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. तो चर्चगेट येथे राहत असून तो त्याच्या मित्रांसोबत कार्यक्रमासाठी आला होता.

शीतल आणि श्रेया यांची प्रकृती नाजूक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे श्रेयाचा मृत्यू झाला होता. या दोघांचे मृतदेह नंतर शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले होते. तिथेच त्यांच्या रक्ताचे नमूने घेण्यात आले होते. शीतलवर आयसीयूमध्ये उपचार सुरु होते. तिने तिच्या जबानीत ती तिच्या 25 कॉलेज तरुण-तरुणीसोबत नेस्को सेंटरमधील कार्यक्रमांसाठी गेली होती. तिथेच रौनक खंडेलवालने तिला एक पिवळी गोळी दिली होती. रौनकने तिला यापूर्वीही एका कार्यक्रमात ही गोळी दिली होती. रौनक हा त्यांचा मित्र असून तो जमनालाल बजाज मॅनेजमेंट इंस्टिट्यूटमध्ये शिकत असल्याचे सांगितले. पाण्यातून ती गोळी घेतल्यानंतर तिला तिची प्रकृती बिघडली होती. त्यावेळी श्रेया ही चांगली होती, ती तिच्या मित्रांसोबत डान्स करत होती असे शीतलने आपल्या जबानी पोलिसांना सांगितले.

या कार्यक्रमांचे आयोजक विहान ऊर्फ आकाश आणि सन्नी जैन यांनी केले होते. स्वतच्या आर्थिक् फायद्यासाठी कार्यक्रमांत काही तरुण मद्यप्राशन तसेच ड्रग्जचे सेवन करतात याची या दोघांनाही आयोजक म्हणून माहिती दिली होती. त्यांनी स्वतसोबत मद्यासह ड्रग्ज आणले आहे का याची तपासणी करण्यात आली नव्हती. या दोघांनी जाणीवपूर्वक सुरक्षेत हलगर्जीपणा केला होता. तिथे प्रवेश दिलेल्या तरुण-तरुणींना ड्रग्ज सेवन करण्यास आणि बाळगण्यास प्रवृत्त केले होते. त्यांच्याच हलगर्जीपणामुळे बिस्मातसिंह आणि श्रेया यांचा मृत्यू झाला होता तर इतरांना विनापरवाना मद्यप्राशन करण्यास प्रवृत्त केले होते. त्यामुळे कार्यक्रमाच्या आयोजकासह इतर आरोपीविरुद्ध 105, 125, 125 (बी), 223 (बी), 3 (5) भारतीय न्याय सहिता सहकलम 65 महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम सहकलम 8 (सी), 22, 29 एनडीपीएस कलमांतर्गत वनराई पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.

गुन्हा दाखल होताच रौनक खंडेलवाल, विहान सामल, सनी जैन, बालकृष्णन कुरुप आणि प्रतिक पांडे यांना अटक करण्यात आली होती. अटकेनंतर या सर्वांना 16 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. तपासात प्रतिक पांडेने त्यांना ते ड्रग्ज आनंद पटेलने दिल्याचे सांगितले. आनंद एका पोर्टल अ‍ॅपद्वारे ते ड्रग्ज पार्सल त्यांच्याकडे डिलीव्हरी केली होती. तपासात आलेल्या या माहितीनंतर आनंदला कल्याण येथून पोलिसांनी अटक केली. त्यालाही कोर्टाने 16 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दुसरीकडे या घटनेची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत गुन्ह्यांतील प्रत्येक आरोपीविरुद्ध भक्कम पुरावे गोळा करण्यास तसेच इतर आरोपींच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेण्याचे आदेश वनराई पोलिसांना दिले आहेत.

या गुन्ह्यांत इतर काही आरोपी पोलिसांच्या रडारवर असून त्यांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. आनंदने ड्रग्ज कोणाकडून घेतले, त्याने यापूर्वी अशाच ड्रग्जची विक्री केली आहे का, तो मागणीनुसार ग्राहकांना ड्रग्ज देत होता, त्याने आतापर्यंत कोणकोणते ड्रग्ज त्याच्या ग्राहकांना पुरविले आहेत. त्याचे इतर काही सहकारी आहेत का, ड्रग्ज विक्री करणारी ही एक टोळी आहे का याचा पोली तपास करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page