मालाड येथे प्रोफेसरच्या हत्येचा तपास रेल्वे पोलिसांकडून पूर्ण

आरोपीविरुद्ध 247 पानांचे आरोपपत्र बोरिवली कोर्टात सादर

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
15 एप्रिल 2026
मुंबई, – जानेवारी महिन्यांत मालाड रेल्वे स्थानकात एन. एम कॉलेजचे प्रोफेसर आलोककुमार सिंग या 32 वर्षांच्या प्रोफेसरच्या हत्येचा तपास बोरिवली रेल्वे पोलिसांकडून पूर्ण झाला आहे. याच गुन्ह्यांत बोरिवली रेल्वे पोलिसांकडून बोरिवलीतील लोकल कोर्टात आरोपी ओमकार एकनाथ शिंदे याच्याविरुद्ध 247 पानांचे आरोपपत्र सादर करण्यात आले आहे. या आरोपपत्रात 63 साक्षीदारांची जबानी नोंदविण्यात आली असून त्यात घटनेच्या वेळेस उपस्थित असलेल्या दोन प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचा समावेश आहे. या जबानीनंतर इतर काही पुरावे कोर्टात सादर करण्यात आले आहे. आरोपीला शिक्षा होण्यासाठी भक्कम पुरावे सादर केल्याचा दावा रेल्वे पोलिसांकडून करण्यात आला आहे.

आलोककुमार हे मालाड पूर्वेला राहत होते. विलेपार्ले येथील एन. एम कॉलेजमध्ये प्रोफेसर म्हणून काम करत होते. शनिवारी 24 जानेवारीला सायंकाळी त्यांनी अंधेरी रेल्वे स्थानकातून बोरिवलीकडे जाणारी लोकल पकडली होती. लोकलमध्ये गर्दी असल्याने ते उभे राहून प्रवास करत होते. ही लोकल सायंकाळी पावणेसहा वाजता मालाड रेल्वे स्थानकात आली होती, यावेळी लोकलमधून उतरताना त्यांच्या मागे असलेल्या ओमकारने त्यांना धक्का मारण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्या पुढे एक महिला असल्याने त्यांनी ओमकारला धक्का मारु नकोस असे सांगितले होते. तरीही तो त्यांना धक्का देत होता.

याच कारणावरुन त्यांच्यात वाद झाला आणि त्याचे पर्यावसान भांडणात झाले होते. यावेळी त्यांच्यात झालेल्या शाब्दिक बाचाबाचीनंतर ओमकारने त्याच्याकडील तिक्ष्ण हत्याराने आलोककुमार यांच्यावर वार केले होते. त्यात गंभीररीत्या जखमी झालेल्या आलोककुमार यांना शताब्दी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले होते. याप्रकरणी हत्येचा गुन्हा नोंद होताच बोरिवली रेल्वे पोलिसांनी पळून गेलेल्या मारेकर्‍याचा शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असताना ओमकार शिंदे याला मालाड येथून रेल्वे पोलिसांनी अटक केली होती.

ओमकार हा मालाड येथील कुरार व्हिलेज परिसरात राहतो. तो दागिने पॉलिश करण्याचे काम करत होता. हत्येनंतर तो त्याच्या घरी गेला होता. मात्र सीसीटिव्ही फुटेजमध्ये त्याची ओळख पटल्याने त्याला काही तासांत पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत तो सध्या जेलमध्ये न्यायालयीन कोठडीत आहे. त्याच्या राहत्या घरातून पोलिसांनी गुन्ह्यांतील हत्यार आणि कपडे जप्त केले होते.

गुन्ह्यांच्या दिवसाचे सीसीटिव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यातील एका फुटेजमध्ये ओमकार पळून जाताना स्पष्टपणे दिसत आहे. या गुन्ह्यांत आतापर्यत 63 जणांची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली असून त्यात दोन प्रत्यक्षदर्शीचा समावेश आहे. या गुन्ह्यांचा तपास पूर्ण झाल्याने रेल्वे पोलिसांनी आरोपी ओमकार शिंदे याच्याविरुद्ध 247 पानांचे आरोपपत्र सादर केले आहे. आरोपपत्रात ओमकारवर हत्येचा गुन्हा सिद्ध होईल याबाबत भक्कम पुरावे सादर करण्यात आल्याचा दावा पोलिसांकडून करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page