रोहित शेट्टी फायरिंगप्रकरणात अन्य एका आरोपीस अटक
मुंबई पोलिसांसह उत्तरप्रदेश स्पेशल टास्क फोर्सची कारवाई
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
16 एप्रिल 2026
मुंबई, – बॉलीवूडसह उद्योग जगतात दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने प्रसिद्ध बॉलीवूड निर्माता-दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या घराजवळील फायरिंगप्रकरणी मुंबई पोलिसांच्या विशेष पथकाने उत्तर प्रदेशच्या स्पेशल टास्क फोर्सच्या मदतीने एका वॉण्टेड आरोपीस आग्रा येथून अटक केली. प्रदीपकुमार रामसिंह ऊर्फ गाठ ऊर्फ छोटू असे या आरोपीचे नाव असून तो उत्तरप्रदेशच्या आग्रा, अशोकनगर, न्यू बस्ती पक्की तलैयाचा रहिवाशी आहे. ट्रॉन्झिंट रिमांड घेतल्यांनतर त्याचा ताबा गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे. अटकेनंतर त्याला पुढील कारवाईसाठी मुंबईत आणले जात असून याच गुन्ह्यांत त्याला शुक्रवारी मोक्का कोर्टात हजर केले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. यापूर्वी याच पथकाने हरियाणा आणि उत्तरप्रदेशातून एका मुख्य शूटरसह सातजणांना अटक केली होती.
31 जानेवारीला रात्री उशिरा रोहित शेट्टी यांच्या जुहू येथील शेट्टी हाऊसजवळ काही अज्ञात व्यक्तींनी फायरिंग केले होते. या फायरिंगमध्ये कोणीही जखमी झाले नव्हते. मात्र गोळीबाराच्या घटनेने परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याप्रकरणी जुहू पोलिसांत गुन्हा दाखल होताच त्याचा तपास नंतर खंडणीविरोधी पथकाकडे सोपविण्यात आले होते. हा तपास हाती येताच दुसर्या दिवशी स्वप्निल बंडू सकट, समर्थ शिवशरण पोमाजी, सिद्धार्थ दिपक येनपुरे, आदित्य ज्ञानेश्वर गायकी या चौघांना पुण्यातून पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर मुंबई पोलिसांनी मुंबईसह उत्तरप्रदेश आणि हरियाणा राज्यातून काही आरोपींना अटक केली होती. या आरोपींविरुद्ध नंतर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली होती.
याच गुन्ह्यांत प्रदीपकुमारचा सहभाग उघडकीस आला होता. मात्र तो गेल्या चार महिन्यांपासून फरार होता. तो सतत पोलिसांना गुंगारा देत होता. अलीकडेच प्रदीपकुमार हा त्याच्या आग्रा येथील घरी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर गुन्हे शाखेची एक टिम आग्रा येथे गेली होती. या पथकाने उत्तरप्रदेश स्पेशल टास्क फोर्सच्या मदतीने वॉण्टेड असलेल्या प्रदीपकुमारला त्याच्या आग्रा येथील राहत्या घरातून ताब्यात घेतले होते. चौकशीत त्याचा या गुन्ह्यांत सहभाग उघडकीस आला होता.
या कटातील मुख्य वॉण्टेड आरोपी शुभम लोणकर याच्या सोशल मिडीयाच्या पोस्ट पाहून प्रदीपकुमार हा प्रभावित झाले होते. त्यानंतर त्याने शुभमसाठी काम करण्याचा निर्णय घेतला होता. त्याला टोळीसाठी मोठी कामगिरी करायची होती. रोहित शेट्टी यांच्या घराजवळ फायरिंग करुन शुभमला बॉलीवूडसह उद्योग जगतात स्वतची दहशत निर्माण करायची होती. दशहत निर्माण केल्यानंतर त्यांच्याकडून त्याला कोट्यवधी रुपयांची खंडणी वसुल करायची होती. त्यासाठी त्याने टोळीत अनेक तरुणांना सामिल करुन घेतले होते. त्यांना कामासाठी भरमसाठ पैसे देण्याची ऑफर देण्यात आली होती. त्यात प्रदीपकुमारचा समावेश होता.
तपासात आलेल्या या माहितीनंतर त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी त्याला कोर्टाने ट्रान्झिंट रिमांड सुनावली होती. त्यांनतर त्याचा ताबा मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेला सोपविण्यात आला. त्याला पुढील कारवाईसाठी मुंबईत आणले जात आहे. याच गुन्ह्यांत त्याला मोक्का कोर्टात हजर करुन त्याची जास्तीत जास्त पोलीस कोठडी मागितली जाणार आहे. त्याच्या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.