क्रिकेट खेळण्यावरुन झालेल्या वादातून पिता-पूत्रावर हल्ला
गुन्हा दाखल होताच आरोपी पित्यासह दोन मुलांना अटक
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
15 एप्रिल 2026
मुंबई, – क्रिकेट खेळण्यावरुन सुरु असलेल्या वादातून एका पिता-पूत्रावर एकाच कुटुंबातील चौघांनी प्राणघातक हल्ला केल्याची घटना दहिसर येथे उघडकीस आली आहे. या हल्ल्यात राजेश धनश्याम भटिचा आणि त्यांचा मुलगा ओम राजेश भटिचा हे दोघेही जखमी झाले होते. याप्रकरणी भारतीय न्याय सहिता कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच आरोपी पित्यासह त्याच्या दोन्ही मुलांना पोलिसांनी अटक केली. रामपुकार बुद्धन राम, शिवदयाल बुद्धन राम आणि करणकुमार बुद्धन राम अशी या तिघांची नावे आहेत. अटकेनंतर या तिघांनाही बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. या गुन्ह्यांत रितेशकुमार रामपुकार राम या पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.
राजेश धनश्याम भटीचा हे दहिसर येथील घरटनपाडा, गणेश चाळीत त्यांची पत्नी हिना, मुलगा ओम यांच्यासोबत राहतात. त्यांचा कपडे विक्रीचा व्यवसाय आहे तर त्यांचा मुलगा सध्या शिक्षण घेतो. याच परिसरात रामपुकार राम राहत असून त्यांचा मुलगा रितेशकुमार हा त्यांच्या मित्रांसोबत त्यांच्या घरासमोरील मैदानात क्रिकेट खेळतो. त्यामुळे अनेकदा बॉल त्यांच्या घरी येत असल्याने त्यांनी त्यांना तिथे क्रिकेट खेळू नका असे सांगितले होते. मात्र रितेशकुमार तिथेच मित्रांसोबत क्रिकेट खेळत होता. याच कारणावरुन त्यांच्यात अनेकदा खटके उडत होते. शुक्रवारी दुपारी दिड वाजता रितेशकुमार त्यांच्या घरासमोरच त्यांचा मोबाईलवरुन व्हिडीओ काढत होता. त्यामुळे त्यांनी त्याला जाब विचारला असता त्यांच्यात पुन्हा शाब्दिक बाचाबाची झाली होती.
रागाच्या भरात त्याने त्यांना शिवीगाळ करुन बांबूने बेदम मारहाण केली होती. मात्र चाळीचा वाद असल्याने त्यांनी त्याच्याविरुद्ध तक्रार केली नव्हती. रात्री आठ वाजता रामपुकार हा त्याचे तिन्ही मुले शिवदयाल, करणकुमार आणि रितेशकुमार यांचयासोबत राजेश भटीचा यांच्या घरी आला होता.यावेळी त्याने दुपारचा वाद काढून त्यांच्याशी पुन्हा वाद घालण्यास सुरुवात केली. रागाच्या भरत त्यांनी त्यांना बांबूसह तिक्ष्ण हत्याराने वार केले होते. त्यात राजेश हे जखमी झाले होते. यावेळी त्यांच्या पत्नीसह मुलाने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी त्यांनाही बेदम मारहाण केली होती.
अचानक सुरु झालेल्या आरडाओरडानंतर स्थानिक रहिवाशांनी तिथे धाव घेतली होती. यावेळी राम कुटुंबियांनी आमच्या नादाला लागू नका, नाहीतर गंभीर परिणाम होतील अशी धमकी देऊन तेथून पलायन केले. या मारहाणीत राजेशसह त्यांचा मुलगा ओम हा गंभीररीत्या जखमी झाले होते. त्यामुळे त्यांना कांदिवलीतील शताब्दी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे त्यांच्यावर प्राथमिक औषधोपचार करण्यात आले होते. उपचारानंतर त्यांनी घडलेला प्रकार दहिसर पोलिसांना सांगितला. त्यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी रामपुकार व त्याच्या तिन्ही मुलांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.
गुन्हा दाखल होताच रामपुकार राम, शिवदयाल राम आणि करणकुमार राम या तिघांना पोलिसांनी अटक केली तर रितेशकुमार हा घटनास्थळाहून पळून गेला होता. अटकेनंतर तिघांनाही रविवारी दुपारी बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली होती.