लॅपटॉप-मोबाईल अपहारप्रकरणी शाहरुख खानला एक वर्षांनी अटक

साडेनऊ लाखांचा अपहाराचा मुद्देमाल लवकरच हस्तगत करणार

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
15 एप्रिल 2026
मुंबई, – भाड्याने घेतलेल्या सुमारे साडेनऊ लाखांचे पाच आयफोन आणि दहा लॅपटॉपचा अपहार करुन पळून गेलेल्या शाहरुख सादिक खान या वॉण्टेड आरोपीस एक वर्षांनी वाकोला पोलिसांनी पुण्यातून अटक केली. अटकेनंतर त्याला वांद्रे येथील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याच्याकडून अपहार केलेले आयफोन आणि लॅपटॉप लवकरच हस्तगत केले जाणार आहे. त्याने अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केले आहेत का याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.

जुझर मोईस भारमल हे अंधेरीतील मरोळ-मरोशी रोड परिसरात राहत असून त्यांचा कॉम्प्युटर डेपो नावाचा एक शॉप सांताक्रुज येथील नेहरु रोड, विहार हॉटेलजवळ आहे. त्यांचा मोबाईल, लॅपटॉपसह इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू भाड्याने देण्याचा व्यवसाय आहे. त्यांनी त्यांच्या शॉपची जाहिरात सोशल मिडीयावर केली होती. ही जाहिरात पाहून त्यांच्याकडे येणार्‍या ग्राहकांची ओळख पटवून ते त्यांना लॅपटॉप आणि मोबाईल भाड्याने देतात, त्यामोबदल्यात त्यांच्याकडून ठराविक रक्कम भाडे म्हणून घेतले जाते. 29 जानेवारी 2024 रोजी शाहरुख हा त्यांच्या शॉपमध्ये आला होता. शेअरमार्केट ट्रेडिंगसाठी त्याला लॅपटॉप आणि आयफोन भाड्याने पाहिजे होता. त्यासाठी त्याने त्याचा पॅनकार्ड, आधारकार्ड आणि पासपोर्टची झेरॉक्स प्रत दिली होती. त्यानंतर जुझर भारमल यांनी त्याला एक आयफोन आणि लॅपटॉप हिला होता.

काही दिवसांनी त्याने त्याच्या मित्रांसाठी काही मोबाईल आणि लॅपटॉपची माहिती केली होती. त्याचे दस्तावेज त्यांच्याकडे होते, त्यामुळे त्यांनी त्याला त्याच्या मित्रांसाठी आणखीन चार आयफोन आणि नऊ लॅपटॉप दिले होते. जानेवारी ते फेब्रुवारी 2024 या कालावधीत त्याने त्यांच्याकडून साडेनऊ लाखांचे पाच आयफोन आणि दहा लॅपटॉप भाड्याने घेतले होते. मात्र ठरल्याप्रमाणे त्यांनी मोबाईलसह लॅपटॉपचे भाडे दिले नव्हते. कॉल केल्यानंतर तो आज-उद्या करुन त्यांना टाळण्याचा प्रयत्न करत होता. त्यामुळे त्यांनी त्याच्या डोंबिवली आणि पुण्यातील राहत्या घरी जाऊन पाहणी केली होती. मात्र त्याने दिलेला पत्ता बोगस असल्याचे त्याच्या लक्षात आले होते. काही दिवसांनी त्याने त्यांना प्रतिसाद देणे बंद केले होते, त्यांचा कॉल ब्लॉक केले होते.

जवळपास वर्षभर त्यांनी त्याचा पाठपुरावा केला, मात्र त्याच्याकडून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे एप्रिल 2025 रोजी त्यांनी घडलेला प्रकार वाकोला पोलिसांना सांगून शाहरुख खानविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर शाहरुख खान याच्याविरुद्ध पोलिसांनी आयफोन आणि लॅपटॉपचा अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच त्याचा पोलीस शोध घेत होते, गेले वर्षभर तो पोलिसांना सतत गुंगारा देत होता, तरीही पोलिसांनी त्याचा शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असताना शाहरुख खान हा पुण्यात लपला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

या माहितीनंतर वाकोला पोलिसांच्या एका विशेष पथकाने तिथे साध्या वेशात पाळत ठेवून त्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्यानेच जुझर भारमल यांच्या शॉपमधून भाड्याने घेतलेल्या आयफोन आणि लॅपटॉपचा अपहार केल्याची कबुली दिली. या कबुलीनंतर त्याला अटक करुन पुण्यातून मुंबईत पुढील कारवाईसाठी आणण्यात आले होते. अटकेनंतर त्याला मंगळवारी दुपारी वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.

त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. अपहार केलेले आयफोन आणि लॅपटॉपचे त्याने काय केले, ते कोणाला विक्री केली आहे का, याकामी त्याला इतर कोणी मदत केली का, त्याने अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केले आहेत का याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page