जिम ट्रेनर असलेल्या 37 वर्षांच्या भोंदूबाबाचा पर्दाफाश
दैवी शक्ती असल्याचा दावा करुन भक्तांची फसवणुक करत होता
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
16 एप्रिल 2026
मुंबई, – जिम ट्रेनर असलेल्या एका 37 वर्षांच्या भोंदूबाबाचा दिडोंशी पोलिसांनी पर्दाफाश केला. रिदम अशोक पांचाळ ऊर्फ मॉण्टी असे या आरोपी भोंदूबाबाचे नाव असून त्याच्याविरुद्ध भारतीय न्याय सहितासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच गुन्ह्यांत त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. अंगात दैवी शक्ती असल्याचा दावा करुन रिदमने अघोरी पूजा आणि अंधश्रद्धेच्या नावाने अनेक भक्तांची फसवणुक केल्याचे बोलले जाते. अघोरी पूजेसाठी तो भक्तांकडून दारु, सिगारेट, बकर्याचे काळीज, लिंबू आणि स्मशानाची राख मागवत असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र शिंदे यांनी बोलताना सांगितले.
अनोश एडल मोरेना हे व्यावसायिक असून मालाडच्या मंचुभाई रोड, आदित्य अपार्टमेंटमध्ये राहतात. काही दिवसांपूर्वी त्यांना रिदम पांचाळ या भोंदूबाबाबाबत माहिती समजली होती. त्याच्याकडे विशेष अलोलिक शक्ती असून त्यांच्या अंगात देवाचा संचार आहे. भूत उतरविणे, नोकरीत यश, पितृदोष किंवा कुठलेही काम करुन देण्यासाठी त्यांच्याकडून बोकडाचे काळीज, काळा कपडा, काळे तीळ, स्मशानाची राख, लिंबू काळी बाहुली, दारुची बाटली, सिगारेट, उडद दाळ, लात आणि काळा कुंकू, मिक्स फरसाण आदी वस्तू मागून पूजा करतो. तो स्वत दारु आणि सिगारेट पिऊन इतर वस्तूंचा उतारा करुन एका लाल आणि काळ्या कपड्यामध्ये बांधून ते तीन रस्ता किंवा चौकात टाकण्याचा सल्ला देतो. तसे केल्यानंतर संबंधित व्यक्तीचे सर्व काम होतात.
त्यांच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होतात असे भासविण्याचा प्रयत्न करत होता. दुसरीकडे त्याच्या सांगण्याप्रमाणे एखाद्या व्यक्तीने केले नाही किंवा त्याच्या कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्या जिवाचे बरे-वाईट होईल अशी धमकी देत होता. आपल्या अंगात भैरव देव संचारला आहे असे सांगून तो दुसर्या व्यक्तीच्या अंगातील भूत उतरवत होता. गेल्या काही दिवसांपासून त्याच्या या काळ्या जादूला भुलून त्याच्याकडे येणार्या भक्ताच्या संख्येत प्रचंड वाढ झाली होती. अघोरी पूजा आणि अंधश्रद्धेच्या नावाखाली तो त्याच्या भक्ताची फसवणुक होत असल्याची तक्रार अनोश मोरेना यांनी दिडोंशी पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची अतिरिक्त पोलीस आयुक्त शशिकुमार मीना, पोलीस उपायुक्त महेश चिमटे यांनी गंभीर दखल घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र शिंदे यांना संबंधित भोंदूबाबाविरुद्ध कठोर कारवाईचे आदेश दिले होते.
या आदेशानंतर दिडोंशी पोलिसांकडून संबंधित प्रकरणाची शहानिशा करण्यात आली होती. त्यात रिदम पांचाळ नावाचा भोंदू हा अनेकांना वेगवेगळे वस्तू आणण्यास भाग पाडून, तिथे पूजा करुन भक्तांची फसवणुक करत असल्याचे उघडकीस आले होते. या माहितीनंतर सहाय्यक पोलीस आयुक्त विजय भिसे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र शिंदे, पोलीस निरीक्षक शरद सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन सुरवसे, सहाय्यक फौजदार मोरे, पोलीस हवालदार शंकर माईंगडे, हेमंत रोडे, मंगेश लोंढे, समरेश भोगले, पोलीस शिपाई झिंबल यांनी रिदम पांचाळ याला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत त्याच्या अंगात कुठलीही दैवी शक्ती नसल्याचे, लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन तो अनेकांना खोटी आश्वासने देऊन त्यांच्या आयुष्यातील संकटे दूर करण्याचे आमिष दाखवून त्यांची फसवणुक करत होता.
तपासात ही माहिती उघडकीस येताच त्याच्याविरुद्ध पोलिसांनी भारतीय न्याय सहिता, महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ठ आणि अघोरी प्रथा-जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत त्याचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम 2013 अन्वये गुन्हा दाखल केला होत. याच गुन्ह्यांत त्याला बुधवारी पोलिसांनी अटक केली. तपासात दिम पांचाळ हा मालाड येथील मंचुभाई रोड, बीएमसी गार्डनजवळील शिव सदन चाळीत राहत असून पूर्वी तो जिम ट्रेनर म्हणून काम करत होता. ही नोकरी सोडून तो गेल्या काही दिवसांपासून भोंदूगिरी करत होता. त्यातून त्याने परिसरात स्वतची प्रचंड जाहिराबाजी केली होती.
त्याच्या अंगात दैवी शक्ती असल्याचे समजून अनेकजण त्याच्याकडे त्यांच्या समस्या घेऊन येत होता. मात्र या समस्यांवर काहीच उपाययोजना न करता तो त्याच्या अज्ञानपणाचा गैरफायदा घेत असल्याचे उघडकीस आले आहे. अटकेनंतर त्याला गुरुवारी दुपारी बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु असून या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे बाहेर येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या गुन्ह्यांचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन सुरवसे हे करत असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र शिंदे यांनी सांगितले.