पोलीस गस्तदरम्यान एमडीएमए गोळ्यांसह आरोपीस अटक
26 लाखांच्या ड्रग्ज गोळ्यासह गुन्ह्यांतील बाईक हस्तगत
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
16 एप्रिल 2026
मुंबई, – पोलीस गस्तदम्यान पोलिसांना पाहून एमडीएमए गोळ्या असलेली पिशवी रस्त्यावर फेंकून पळून जाण्याचा प्रयत्न करणार्या एका 39 वर्षांच्या आरोपीस घाटकोपर युनिटच्या अॅण्टी नारकोटीक्स सेलच्या अधिकार्यांनी अटक केली. इरफान अब्बासअली अन्सारी असे या आरोपीचे नाव असून त्याच्याकडून पोलिसांनी 26 लाख रुपयांचे 104 एक्स्टँसी (एमडीएमए) गोळ्यांचा साठा तसेच गुन्ह्यांतील बाईक हस्तगत केली आहे. त्याच्यविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत कारवाई करण्यात आली असून अटकेनंतर त्याला कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. एमडीएमए गोळ्याच्या विक्रीसाठी इरफान हा तिथे आला होता, मात्र विक्रीपूर्वीच त्याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
गेल्या काही दिवसांत ड्रग्ज तस्करीच्या गुन्ह्यांत लक्षणीय वाढ झाल्याने वरिष्ठांच्या आदेशानंतर पोलिसांनी परिसरात गस्तीवर अधिक भर दिली होती. मंगळवारी रात्री घाटकोपर युनिटचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक भगवान बेले, अभिजीत अहिरराव, पोलीस हवालदार रावते, दिप यशवंते, पाटील, शिंदे, पोलीस शिपाई गायकवाड आदीचे एक विशेष पथक परिसरात गस्त घालत होते. रात्री अकरा वाजता या पथकाला अंधेरीतील अंधेरी-कुर्ला रोड, साकिनाका, सेव्हन ऑलिव्ह हॉटेलसमोर काही तरुणांमध्ये भांडण सुरु असल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली होती. त्यामुळे पोलीस पथक तिथे गेले होते, त्यांनी भांडण करणार्या तरुणांना पोलीस असल्याचे सांगून त्यांच्यातील भांडण थांबविण्याचा सल्ला दिला होता.
याच दरम्यान एका तरुणाने त्याच्याकडील एक पिशवी फुटपाथच्या दिशेने फेंकून तेथून पळून जाण्याचा प्रयतन केला होता. हा प्रकार संशयास्पद वाटताच या पथकाने त्याला ताब्यात घेतले. त्याने फेंकून दिलेल्या पिशवीची पाहणी केल्यानंतर या अधिकार्यांना 104 एमडीएमएचे गोळ्या सापडल्या. त्याची किंमत सुमारे 26 लाख रुपये इतकी आहे. तपासात त्याचे इरफान अन्सारी असल्याचे उघडकीस आले. चौकशीत तो तिथे ड्रग्जच्या गोळ्याची विक्रीसाठी आल्याचे उघडकीस आले. त्यानंतर त्याला ताब्यात घेऊन युनिट कार्यालयात आणण्यात आले. त्याच्याविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
याच गुन्ह्यांत नंतर त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. त्याला ड्रग्जच्या गोळ्या कोणी दिल्या, त्या गोळ्या तो कोणाला देण्यासाठी आला होता, त्याने यापूर्वीही ड्रग्जची तस्करी केली आहे का, त्याचे इतर कोणी सहकारी आहेत का याचा पोलीस तपास करत आहेत.