खाजगी कंपनीच्या कर्मचार्याचे अपहरण करुन 32 लाखांची रॉबरी
पळून गेलेल्या चारही अपहरणकर्त्यांचा पोलिसांकडून शोध सुरु
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
18 एप्रिल 2026
मुंबई, – कंपनीच्या आर्थिक व्यवहाराची 32 लाख 50 हजार रुपयांची कॅश घेऊन जाणार्या एका कर्मचार्याचे चारजणांच्या टोळीने अपहरण करुन त्यांच्याकडील कॅश असलेली बॅग पळविल्याची घटना अॅण्टॉप हिल परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी अॅण्टॉप हिल पोलिसांनी चारही अपहरणकर्त्यांविरुद्ध अपहरणासह रॉबरीच्या गुन्ह्यांची नोंद करुन त्यांचा शोध सुरु केला आहे. या गुन्ह्यांत स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेचे अधिकारी संमातर तपास करत आहेत.
श्रवण लक्ष्मण रावल हे विरार येथे राहत असून सांताक्रुज येथील गिता अॅपेक्स मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड या कपड्याच्या कंपनीत आर्थिक व्यवहाराच्या देवाणघेवाणीचे काम करतात. ही कंपनीत यश गंगावणी आणि हनी गंगावानी यांच्या मालकीची असून त्यांच्या कुटुंबियांची अन्य एक कंपनी आहे. या दोन्ही कंपनीसह शॉपचे आर्थिक व्यवहाराची जबाबदारी त्यांच्यावर होती. 14 एप्रिलला त्यांना कंपनीच्या व्हॉटअप ग्रुपवर 50 लाखांची रक्कम राम गंगावणी यांना सायन-कोळीवाडा येथे देण्यास सांगण्यात आले होते. त्यामुळे 50 लाखांची कॅश घेऊन वांद्रे येथील बीकेसी परिसरात आले होते. तेथून ते मेघल फॅब्रिक्स शॉपमध्ये गेले होते. तेथून त्यांनी व्यवहाराची 32 लाख 50 लाखांची कॅश ताब्यात घेतली.
ठरल्याप्रमाणे त्यांनी 50 लाखांची कॅश राम गंगवाणी यांच्या पत्नी गिता गंगावणी यांना दिली आणि उर्वरित कॅश घेऊन ते कंपनीच्या दिशेने निघाले होते. सायन-कोळीवाडा, समिती पंजाबी कॅम्प येथून ते रेपीडो टॅक्सी बुक करत होते. याच दरम्यान तिथे दोन तरुण आले. ते दोघेही त्यांच्याकडे पाहत होते, हा प्रकार संशयास्पद वाटताच ते पुढे चालत निघाले. याच दरम्यान तिथे एक स्कॉपिओ कार आली आणि कारमधील चार अज्ञात व्यक्तींनी त्यांना जबदस्तीने स्कॉपिओ कारमध्ये बसविले.
कारमध्ये या चौघांनी त्यांची चौकशी सुरु केली होती. सुरुवातीला ते पोलीस असल्याचे समजून त्यांनी त्यांना सर्व माहिती सांगितली. तोपर्यंत ही कार घाटकोपरला आली होती. एका ब्रिजजवळ कार थांबवून या चौघांनी त्यांच्याकडील 32 लाख 50 हजार रुपयांची कॅश चोरी करुन त्यांना तिथे सोडून पलायन केले होते.
घडलेल्या प्रकाराने श्रवण रावल हे प्रचंड घाबरले होते. त्यामुळे त्यांनी घडलेला प्रकार त्यांच्या मॅनेजरला सांगितला. त्यांच्या सल्ल्यानंतर त्यांनी अॅण्टॉप हिल पोलिसांना घडलेला प्रकार सांगून चारही आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी चारही आरोपीविरुद्ध अपहरणासह रॉबरीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा पोलिसांकडून तपास सुरु आहे. परिसरातील सीसीटिव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून या फुटेजवरुन आरोपींचा शोध सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.