नेस्को सेंटर ड्रग्जप्रकरणी चार आरोपींच्या कोठडीत वाढ
चारही आरोपींना पोलीस बंदोबस्तात न्यायालयात हजर केले
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
19 एप्रिल 2026
मुंबई, – गोरेगाव येथील नेस्को सेंटरमधील ड्रग्जप्रकरणी पोलीस कोठडीत असलेल्या चार आरोपींना पुन्हा बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी चारही आरोपींच्या पोलीस कोठडीत 23 एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली आहे. आनंद लक्ष्मण पटेल, विनित सुनिल गेरेलानी, शुभ रामलखन अग्रवाल आणि आयुष विकी साहित्य अशी या चौघांची नावे असून या चौघांना दुपारी पोलीस बंदोबस्तात कोर्टात हजर करण्यात आले होते. त्यांच्या बॅक खात्याच्या व्यवहाराच्या पाहणीदरम्यान ड्रग्जशी संबंधित अनेक ऑनलाईन व्यवहार झाल्याचे तसेच आरोपी एका मुख्य ड्रग्ज पुरवठादाराच्या संपर्कात असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. त्यामुळे या आरोपीसह त्याच्या पत्नीच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये एका म्युझिक कॉर्न्स्टमध्ये काही विद्यार्थ्यांना मद्यासह ड्रग्ज देण्यात आले होते. ड्रग्जच्या अतिसेवनामुळे दोन एमबीए विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता तर एका विद्यार्थिनीवर उपचार सुरु आहेत. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच आतापर्यंत वनराई पोलिसांनी दहा आरोपींना वेगवेगळ्या परिसरातून अटक केली होती. त्यातील रौनक राहुल खंडेलवाल, आकाश बनमारी सामल, सनी विनोद जैन, बालकृष्णन बलराम कुरुप आणि प्रतिक बिजेश पांडे हे पाचजण न्यायालयीन कोठडीत आहे तर इतर पाचजण पोलीस कोठडीत आहेत. त्यापैकी आनंद पटेल, विनित गेरेलानी, शुम अग्रवाल आणि आयुष साहित्य यांच्या पोलीस कोठडीची मुदत सोमवारी 20 जानेवारीला संपत होती, त्यामुळे त्यांना सोमवारी दुपारी पुन्हा बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते.
यावेळी तपासाच्या प्रगतीबाबत माहिती देताना पोलिसांनी आरोपींच्या पोलीस कोठडीची विनंती केली होती. ही विनंती मान्य करुन कोर्टाने चारही आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ केली आहे. आतापर्यंतच्या तपासात आयुष हा ड्रग्ज सप्लाय करणार्या एका मोठ्या व्यक्तीच्या संपर्कात असल्याचे निष्पन्न झाले आहेत. संबंधित व्यक्ती या घटनेनंतर पळून गेला आहे. शुभ, आयुष आणि विनित हे तिघेही संबंधित व्यक्तीच्या पत्नीच्या बँक खात्यात ड्रग्ज विक्रीतून आलेले पैसे ट्रान्स्फर करत होते. दुसरीकडे या गुन्ह्यांतील बाऊंसर प्रदीप गुप्ता याने आयुष आणि विनितला म्युझिक कॉर्न्स्टमध्ये पैसे घेऊन सोडले होते, त्याने अशाच प्रकारे इतर काही लोकांना विनातिकिट आतमध्ये प्रवेश दिल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे या सर्व आरोपींची समोरासमोर चौकशी होणार आहे.
आरोपींच्या बँक खात्याची पाहणी केल्यानंतर त्यांच्या खात्यात दहा दिवसांपूर्वी आणि गुन्हा घडल्यानंतर मोठ्या प्रमाणात पैशांची देवाणघेवाण झाल्याचे दिसून आले आहे. या आरोपींचा ड्रग्ज सिंडिकेटशी संबंध असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे या गुन्ह्यांतील पाहिजे आरोपींची साखळी जोडून ड्रग्ज सिंडिकेट रॅकेट समूळ नष्ट करण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न सुरु केले आहेत. आरोपींनी मोठ्या प्रमाणात ड्रग्जचा साठा साठवून ठेवल्याची शक्यता आहे. त्याची तपास करणे तसेच याकामी त्यांना मदत करण्याचा शोध सुरु आहे. ड्रग्जचा पुरवठा आयोजकांच्या मदतीशिवाय होऊ शकत नाही. आयोजकांनी ज्या ज्या कंपनीला वेगवेगळे व्हेंडरचे काम दिले होते, त्या सर्व व्हेंडरची पोलिसांकडून चौकशी होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.