48 तासांत चोरीच्या कॅशसहीत नोकराला उत्तरप्रदेशातून अटक
13 लाख 86 हजाराची चोरी तर 10 लाख 47 हजार हस्तगत
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
21 एप्रिल 2026
मुंबई, – वयोवृद्ध मालकाच्या मसाल्याच्या दुकानातील ड्राव्हरमधील 13 लाख 86 हजाराची कॅश नोकराने चोरी करुन उत्तरप्रदेशात पलायन केले, मात्र चोरीचा गुन्हा दाखल होताच अवघ्या 48 तासांत पळून गेलेल्या नोकराला चोरीच्या कॅशसहीत काळचौकी पोलिसांच्या एका विशेष पथकाने शिताफीने अटक केली. अजयकुमार श्यामसुंदर रावत असे या आरोपी नोकराचे नाव असून त्याच्याकडून पोलिसांनी चोरीची 10 लाख 47 हजाराची कॅश पोलिसांनी हस्तगत केली आहे. चोरीच्या याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याच्याकडून लवकरच उर्वरित कॅश हस्तगत केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
सुजीत दत्ताराम खामकर हे 61 वर्षांचे वयोवृद्ध अंधैरीतील चार बंगला परिसरात राहत असून त्यांचा लालबाग मार्केटमध्ये एक मसाल्याचे दुकान आहे. या शॉपमध्ये त्यांच्या भावासोबत तीन नोकर कामाला आहेत. त्यात विजयकुमार रावत आणि अजयकुमार रावत या दोन बंधूंचा समावेश आहे. विजयकुमार त्यांच्याकडे दहा तर अजयकुमार पाच वर्षांपासून काम करत होते. ते दोघेही मूळचे उत्तरप्रदेशच्या मनकापूर हरनाटायर गोंडा, श्यामसुंदर रावतचे रहिवाशी आहे. सुजीत खामकर हे अंधेरीला राहत असल्याने ते दिवसभरातील रक्कम त्यांच्या ड्राव्हरमध्ये ठेवत होते. सात ते आठ दिवसांनी ही रक्कम नंतर बँकेत जमा केली जात होती. 15 एप्रिलला त्यांनी आठ दिवसांची 13 लाख 86 हजार 200 रुपयांची कॅश ड्राव्हरमध्ये ठेवली होती.
दुसर्या दिवशी ते नेहमीप्रमाणे दुकानात आले होते, त्यांनी ड्राव्हरमधील कॅश तपासली असता त्यात कॅश नव्हती. त्यांनी सर्वत्र कॅशची पाहणी केली, मात्र त्यांना कुठेच कॅश दिसली नाही. त्याच दिवशी अजयकुमार हा कामावर आला नव्हता. त्याचे दोन्ही मोबाईल बंद होते. दुकानातील सीसीटिव्ही फुटेजची पाहणी केल्यानंतर अजयकुमार हा रात्री बारा वाजता सीसीटिव्ही हार्डडिस्क लावलेल्या मशीनकडे स्टुलवर उभा राहून पाहत असल्याचे दिसून आले. त्यानतर सीसीटिव्ही बंद झाले होते. त्यामुळे दुकानातील कॅश अजयकुमारने चोरी करुन पलायन केल्याची त्यांची खात्री पटली होती. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी अजयकुमारविरुद्ध काळाचौकी पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल करुन अजयकुमारचा शोध सुरु केला होता.
ही शोधमोहीम सुरु असताना अजयकुमार हा त्याच्या उत्तरप्रदेशातील गावी पळून गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर पोलीस आयुक्त देवेन भारती, अतिरिक्त पोलीस आयुक्त विक्रम देशमाने, पोलीस उपायुक्त रागसुधा आर, सहाय्यक पोलीस आयुक्त धनश्याम पंतगे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हसन मुलानी, पोलीस उपनिरीक्षक शीतल माने, पोलीस हवालदार अमर चन्ने, गोविंद ठोके, पोलीस शिपाई प्रशांत पवार, चंद्रकांत कुंभार, संकेत नायकवाडी, महिला पोलीस शिपाई तेजस्विनी गवारी आदींचे एक पथक उत्तरप्रदेशला रवाना झाले होते.
यावेळी गावी आलेल्या अजयकुमारला पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेतले. चौकशीत त्यानेच ही चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून पोलिसांनी 10 लाख 47 हजार 520 रुपयांची कॅश जप्त केली आहे. त्याला पुढील कारवाईसाठी नंतर मुंबईत आणण्यात आले होते. अटकेनंतर लोकल कोर्टात हजर केले असता कोर्टाने त्याला पोलीस कोठडीत आहे. गुन्हा दाखल होताच अवघ्या 48 तासांत अजयकुमारला अटक करुन त्याच्याकडून चोरीची कॅश पोलिसांनी हस्तगत केली आहे. या कामगिरीचे वरिष्ठांकडून संंबंधित पोलीस पथकाचे कौतुक होत आहे.