शासकीय कंत्राटासह निधी मिळवून देण्याच्या आमिषाने गंडा
सातजणांना 90 लाखांना गंडा घातल्याचे तपासात उघडकीस
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
21 एप्रिल 2026
मुंबई, – राजकीय नेत्यांसह मंत्रालयातील बड्या शासकीय अधिकार्यांशी ओळख असल्याची बतावणी करुन शासकीय कंत्राटासह निधी मिळवून देण्याच्या आमिषाने सातजणांना एका ठगाने सुमारे 91 लाखांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सतीश सोपानराव कदम नावाच्या ठगाविरुद्ध मरिनड्राईव्ह पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. आतापर्यंत सात तक्रारदारांनी त्यांची फसवणुक झाल्याची तक्रार केली असली तरी सतीश कदम याने अशाच प्रकारे इतर काही लोकांची फसवणुक केल्याचे बोलले जाते. त्यामुळे फसवणुकीचा हा आकडा आणखीन वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
हनुमंत लक्ष्मणराव वडजे हे मूळचे नांदेडच्या नायगाव, सुजलेगाव, ईकळीमोरचे रहिवाशी असून त्यांचा स्वतचा व्यवसाय आहे. जानेवारी 2024 रोजी त्यांची सतीश कदमशी ओळख झाली होती. सतीश हा नांदेडच्या उमरी, शेलगावचा रहिवाशी असल्याने त्यांची चांगली मैत्री झाली होती. अनेकदा सतीश हा त्याचे काही राजकीय नेत्यांसह मंत्रालयातील बड्या शासकीय अधिकार्यांशी चांगली ओळख आहे. नगरविकास, सामाजिक न्याय विभागातील कंत्राटे तसेच त्यासाठी लागणारा निधी मिळवून देण्याबाबत बोलत होता. या कंत्राटातून त्यांना चांगला फायदा होईल, मात्र त्यासाठी काही खर्च अपेक्षित आहे असे सांगत होता. त्याच्या या बतावणीला भुलून त्यांनी त्याला शासकीय कंत्राट देण्याबाबत विनंती केली होती. या कामासाठी त्याने त्यांच्याकडून टप्याटप्याने 31 लाख 50 हजार रुपये घेतले होते.
त्यांच्यासह त्याने राजू राठोड यांच्याकडून आठ लाख, रामराव गेमा राठोड यांच्याकडून दहा लाख, विश्वजीत आनंदराव पाटील यांच्याकडून पाच लाख, बालाजी पाटील बामणे यांच्याकडे साडेदहा लाख, देवेंद्र विलास कडू यांच्याकडून बारा असे रोख आणि ऑनलाईनने 90 लाख 90 हजार रुपये घेतले होते. हा संपूर्ण व्यवहार जानेवारी 2024 ते एप्रिल 2026 या कालावधीत झाला होता. मात्र ही रक्कम घेऊन त्याने कोणालाही गेल्या दोन वर्षांत शासकीय कामासह कंत्राटे दिली नाही. त्यामुळे त्यांनी त्याच्याकडे कामासाठी दिलेल्या पैशांची मागणी सुरु केली होती. यावेळी त्याने प्रत्येकाला धनादेश दिला होता, मात्र ते धनादेश बँकेत न वटता परत आले होते. त्यानंतर सतीश कदम हा पळून गेला होता.
फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच हनुमंत वडजे यांच्यासह इतर सातजणांनी मरिनड्राईव्ह पोलीस ठाण्यात धाव घेऊन तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. त्यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी सतीश कदम याच्याविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. सतीश हा पळून गेल्याने त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतले आहे. त्याने अशाच प्रकारे इतर लोकांना गंडा घातल्याचे बोलले जाते. त्यामुळे सतीशकडून फसवणुक झालेल्यांनी मरिनड्राईव्ह पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.