आर्थिक वादातून वयोवृद्धाची चाकूने भोसकून हत्या

हत्येनंतर परिचित मारेकर्‍याचे घटनास्थळाहून पलायन

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
21 एप्रिल 2026
मुंबई, – सुमारे 65 लाखांच्या गुंतवणुकीनंतर परताव्यासह मूळ रक्कमेवरुन सुरु असलेल्या आर्थिक वादातून मोहम्मद इक्बाल इब्राहिम सेलिया नावाच्या एका 78 वर्षांच्या वयोवृद्धाची त्यांच्याच परिचित मारेकर्‍याने चाकूने भोसकून हत्या केल्याची घटना सोमवारी नागपाडा परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी सादिक आकिब जावर याच्याविरुद्ध नागपाडा पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. हत्येनंतर सादिक हा घटनास्थळाहून पळून गेल्याने त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.

ही घटना सोमवाी 20 एप्रिलला सायंकाळी साडेसहा वाजता नागपाडा येथील मदनपुरा, मौलाना आझाद रोड, बिस्मिल्ला हॉटेलसमोरील करीम परदा मेंशनमध्ये घडली. या इमारतीच्या रुम क्रमांक दहामध्ये तंजिला मोहम्मद इक्बाल सेलिया ही महिला तिचे वयोवृद्ध पती मोहम्मद इक्बाल यांच्यासोबत राहते. सादिक हा त्यांचा परिचित असून तो सध्या मिरा-भाईंदर येथे वास्तव्यास आहे. काही महिन्यांपूर्वी मोहम्मद इक्बालने सादिककडे सुमारे 65 लाखांची गुंतवणुक केली होती.

या गुंतवणुकीवर त्याने त्यांना चांगला परतावा देण्याचे आमिष दाखविले होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून तो त्यांना परताव्याची रक्कम देत नव्हता. त्यामुळे त्यांनी मूळ रक्कमेसह परताव्याची रक्कमेची मागणी सुरु केली होती. याच कारणावरुन त्यांच्यात वाद सुरु होता. सोमवारी सायंकाळी साडेसहा वाजता पैशांवरुन त्यांच्यात प्रचंड वाद झाला होता. या वादानंतर रागाच्या भरात सादिकने मोहम्मद इक्बाल यांच्यावर तिक्ष्ण हत्याराने वार केले होते. त्यात त्यांच्या मानेला, छातीला, पोटाला आणि दोन्ही हातांवर गंभीर दुखापत झाली होती.

या हल्ल्यानंतर सादिक तेथून पळून गेला होता. रक्तबंबाळ झालेल्या मोहम्मद इक्बालला स्थानिक रहिवाशांनी तातडीने जे. जे हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिथे त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. हॉस्पिटलमधून ही माहिती प्राप्त होताच नागपाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी तंजिला सेलिया यांच्या जबानीवरुन घडलेला प्रकार पोलिसांना समजला होता. तिच्या तक्रारीवरुन पोलिसांनी सादिकविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला होता. हल्ल्यानंतर सादिक हा पळून गेला असून त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page