पंधरा मिनिटांत सात लाखांच्या मुद्देमालावर हातसफाई

चोरीनंतर पळून गेलेल्या मोलकरणीविरुद्ध गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
21 एप्रिल 2026
मुंबई, – पंधरा मिनिटांत सुमारे सात लाखांच्या मुद्देमालावर मोलकरणीने तिच्या कलाकार असलेल्या मालकाच्या घरी हातसफाई केल्याची धक्कादायक घटना खार परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी दिपाली संजय खारवा या महिलेविरुद्ध खार पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे. दिपालीने यापूर्वी तक्रारदाराकडे काम केले असून यंदा तिने घरातील साफसफाई करताना कपाटातील मौल्यवान वस्तूसह भारतीय आणि विदेशी चलनावर डल्ला मारल्याचे बोलले जाते.

विपुल विक्रम रॉय हे 41 वर्षांचे तक्रारदार त्यांच्या पत्नी आणि मुलीसोबत खार येथील एस. व्ही रोड, कलानिकेतन अपार्टमेंटमध्ये राहतात. ते व्यवसायाने कलाकार आहेत. ते नियमित अर्बन कंपनी लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून त्यांच्या घरी घरकामासाठी मोलकरीण बोलवत होते. ज्या वेळेस कामाची गरज पडेल अशा वेळी ते ऑनलाईल साईटवर मोलकरीणला पाठविण्याची विनंती करत होते. 6 एप्रिलला त्यांनी एका दिवसांसाठी मोलकरणीला पाठविण्याची विनंती केली होती. त्यामुळे त्यांच्या घरी दिपाली खारवा ही आली होती. दिपाली यापूर्वीही त्यांच्या घरी कामासाठी आली होती. त्यामुळे ती त्यांच्या परिचित होती. त्यांच्या घरी काम केल्याने दिपालीला त्यांच्या घरातील सर्व वस्तूची माहिती होती.

सकाळी पावणेदहा वाजता दिपाली ही कामावर आली आणि काम संपल्यानंतर ती दहा वाजता घरातून निघून गेली होती. त्यानंतर विपुल रॉय हे त्यांच्या कामासाठी घरातून गेले होते. रात्री उशिरा ते घर आले होते. यावेळी त्यांनी ड्राव्हर उघडले असता त्यांना कपाटातून काही वस्तू चोरीस गेल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांनी कपाटातील सर्व वस्तूची पाहणी केली होती. यावेळी त्यांना कपाटातून पाच लाख रुपयांचे भारतीय चलन, 85 हजार रुपयांचे चांदीचे ब्रेसलेट, सव्वालाखांचे दोन डायमंड रिंग, दोन लाख ऐंशी हजाराचे शंभर डॉलरच्या तीस युएस डॉलर, 1 लाख 78 हजार रुपयांचे सात हजार युएई दिराम, 42 हजार रुपयांचे थाई बाथ असा सात लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेल्याचे दिसून आले.

त्यांच्या घरी दिपाली वगळता कोणीही आले नव्हते. त्यामुळे पंधरा मिनिट कामासाठी आलेल्या दिपालीनेच साफसफाई करताना कपाटातील मौल्यवान वस्तूवर हातसफाई केली असावी असा संशय व्यक्त करुन त्यांनी खार पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. त्यांनी त्यांच्या तक्रार अर्जात दिपाली खारवा हिच्यावर चोरीचा संशय व्यक्त केला होता. त्यामुळे दिपालीविरुद्ध पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून तिची पोलिसांकडून लवकरच चौकशी होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page