रिक्षाच्या धडकेने ट्रकखाली आल्याने डिलीव्हरी बॉयचा मृत्यू
अपघातप्रकरणी रिक्षाचालकासह ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
23 एप्रिल 2026
मुंबई, – रिक्षाची धडक लागून खाली पडलेल्या एका डिलीव्हरी बॉयचा ट्रकच्या चाकाखाली आल्याने दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना सांताक्रुज परिसरात घडली. अखिलेश वासुदेव चौधरी ऊर्फ अखिलेश कामत असे या मृत डिलीव्हरी बॉयचे नाव असून त्याच्या मृत्यूप्रकरणी आरोपी रिक्षाचालकासह ट्रकचालकाविरुद्ध वाकोला पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अपघातानंतर आरोपी चालक पळून गेल्याने त्यांचा परिसरातील सीसीटिव्ही फुटेजच्या मदतीने शोध सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.
हा अपघात बुधवारी रात्री उशिरा सव्वाबारा वाजता सांताक्रुज येथील वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, न्यू आग्रीपाडा बसस्टॉपसमोर झाला. निलंबर कामत ऊर्फ चौधरी हा मूळचा बिहारच्या मधुबनीचा रहिवाशी असून सध्या वसई परिसरात राहतो. मृत अखिलेश हा त्याचा लहान भाऊ असून तो त्याचा भाचा अरुण चौधरीसोबत मुंबई सेंट्रल येथे राहतो. सध्या अखिलेश हा झोमेटोमध्ये डिलीव्हरी बॉय म्हणून कामाला आहे. बुधवारी रात्री अखिलेश हा सांताक्रुज येथे डिलीव्हरीसाठी आला होता.
रात्री सव्वाबारा वाजता तो न्यू आग्रीपाडा बसस्टॉपसमोरुन जात होता. यावेळी एका रिक्षाने त्याला धडक दिली होती. त्यात तो रस्त्यावर पडला, याच दरम्यान मागून येणारा ट्रक त्याच्या अंगावरुन गेला होता. त्यात अखिलेश हा गंभीररीत्या जखमी झाला होता. यावेळी तिथे उपस्थित लोकांनी त्याला तातडीने सांताक्रुज येथील व्ही. एन देसाई हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. अपघाताची माहिती मिळताच वाकोला पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.
याप्रकरणी एका प्रत्यक्षदर्शीने घडलेला पोलिसांना सांगितला. या माहितीनंतर निलंबर चौधरी याच्या तक्रारीवरुन पोलिसांनी संबंधित रिक्षा आणि ट्रकचालकाविरुद्ध हलगर्जीपणाने वाहन चालवून एका तरुणाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. अपघातानंतर दोन्ही चालक जखमी तरुणाला कुठलीही वैद्यकीय मदत किंवा अपघाताची माहिती पोलिसांना न देता पळून गेले होते. त्यामुळे या दोन्ही चालकांचा वाकोला पोलिसांकडून शोध सुरु आहे.