मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
23 एप्रिल 2026
मुंबई, – कांदिवलीतील एका महिलेच्या घरात प्रवेश करुन सुमारे 34 लाखांचे सोन्याचे दागिने चोरी करुन पळून गेलेल्या घरफोडीचा पर्दाफाश करण्यात चारकोप पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी एका महिलेसह दोघांना पोलिसांनी चोरीच्या मुद्देमालासह अटक केली आहे. त्यात अमोल दशरथ लोखंडे याच्यासह त्याच्या मानलेल्या बहिणीचा समावेश आहे. या दोघांकडून पोलिसांनी 34 लाखांचे सोन्याचे दागिने हस्तगत केल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक चव्हाण यांनी सांगितले. बहिणीनेच भावाच्या मदतीने ही घरफोडी केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. अटकेनंतर या दोघांनाही बोरिवलीतील लोकल कोर्टाने शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
ही घटना रविवारी 12 एप्रिलला सकाळी पाच ते पावणेसहाच्या सुमारास कांदिवलीतील चारकोप, सेक्टर क्रमांक आठ, माऊलीकृपा सोसायटीमध्ये घडली. याच सोसायटीमध्ये मोहीनी श्रीकृष्ण चौधरी ही महिला तिचा मुलगा कौस्तुभसोबत राहते. तिचे पती श्रीकृष्ण चौधरी हे ओमान देशात ड्रिलिंग मॅनेजर म्हणून कामाला असून तीन महिन्यातून ते पंधरा दिवसांसाठी मुंबईत येतात. तिच्या मुलाला कॉलेजला सुट्टी असल्याने ती तिच्या मुलासोबत 10 एप्रिलला तिच्या सिंधुदुर्गच्या वैभववाडीतील गावी गेली होती. तिच्या घरातील टेरेसवर झाडे असल्याने तिने शेजारी राहणार्या श्रद्धा अमीत यादव या महिलेस पाणी घालण्यास सांगितले होते. त्यासाठी तिने घरातील एक चावी तिच्याकडे दिली होती.
मात्र तिच्या घरात कोणीही नसल्याची संधी साधून अज्ञात व्यक्तीने घरातील कुलूप तोडून आत प्रवेश केला होता. कपाटातील सतरा लाख वीस हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी करुन या चोरट्याने पलायन केले होते. 12 एप्रिलला तिने तिने तिच्या मोबाईलवर घरातील सीसीटिव्ही कॅमेर्याचे फुटेजची पाहणी केली होती. त्यात तिला तिच्या घरात एका तरुणाने प्रवेश केल्याचे दिसून आले. हॉलमध्ये प्रवेश करुन कपाटातील दागिने चोरी केले होते. सकाळी पावणेसहा वाजता तो तिच्या घरातून निघून गेला होता. हा प्रकार दिसताच ती गावाहून मुंबईत आली होती. घरात प्रवेश केल्यानंतर तिला सर्व सामान अस्ताव्यस्त पडल्याचे दिसून आले.
कपाटाची पाहणी केल्यानंतर विविध सोन्याचे दागिने चोरट्याने पळविल्याचे दिसून आले. त्यानंतर तिने घडलेला प्रकार चारकोप पोलिसांना सांगितला. तिच्या तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल केला होता. परिसरातील सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरुन पोलिसांना एका संशयिताची ओळख पटली होती. या आरोपीची माहिती काढत असताना तो मूळचा सातार्याचा रहिवाशी असून गुन्हा घडल्यानंतर तो त्याच्या गावी पळून गेल्याची माहिती प्राप्त झाली होती.
या माहितीनंतर पोलीस आयुक्त देवेन भारती, अतिरिक्त पोलीस आयुक्त शशिकुमार मीना, पोलीस उपायुक्त संदीप जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त निता पाडवी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक चव्हाण, पोलीस निरीक्षक महेंद्र सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू थोरात, पोलीस उपनिरीक्षक आबासाहेब पवार, पोलीस हवालदार बाजीराव कराटे, स्वप्निल शिंदे, धनश्याम पाटेकर, अमोल माने, विलास मस्के, सुदेश गायकवाड, आदित्य राणे आदीचे एक पथक सातारा येथे गेले होते. या पथकाने कोरेगाव, तळीये गावातून अमोल लोखंडे याला ताब्यात घेतले.
चौकशीत त्यानेच ही घरफोडी केल्याची कबुली दिली. चोरीचे दागिने त्याने त्याच्या नातेवाईकाकडे ठेवले होते. या नातेवाईकांकडून पोलिसांनी 34 लाखांचे सर्व दागिने हस्तगत केले. तपासात त्याला त्याच्या मानलेल्या बहिणीने मदत केली होती. ही महिला मोहीनी चौधरीच्या परिचित असून तिनेच तिच्या घरी कोणी नसल्याचे सांगून चोरी करण्याचा सल्ला दिला होता. तिच्या सांगण्यावरुन अमोलने ही चोरी करुन पलायन केले होते. त्याच्या चौकशीनंतर या महिलेला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर या दोघांनाही बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.