गोरेगाव नेस्को ड्रग्जप्रकरणी जिया जेकबला पोलीस कोठडी

ड्रग्ज पेमेंट जियाच्या बँक खात्यात जमा झाल्याचे उघडकीस

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
23 एप्रिल 2026
मुंबई, – गोरेगाव नेस्को सेंटरमधील म्युझिक कॉर्न्स्टमध्ये ड्रग्जच्या अतिसेवनामुळे दोन एमबीए विद्यार्थ्यांच्या झालेल्या मृत्यूप्रकरणी बुधवारी अटक केलेल्या जिया रेचल प्रदीप जेकब या 33 वर्षांच्या कलाकार महिलेला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. जिया ही ड्रग्ज तस्करी करणार्‍या चार आरोपींच्या संपर्कात होती, ड्रग्ज पेमेंट तिच्याच बँक खात्यात होत असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. या गुन्ह्यांत प्रत्यक्ष सहभाग नसला तरी ती अप्रत्यक्षपणे ड्रग्ज तस्करांना मदत करत असल्याने तिच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. गोरेगाव येथील नेस्को सेंटरमधील ड्रग्जप्रकरणी आतापर्यंत दहा आरोपींना वनराई पोलिसांनी अटक केली होती. तयापैकी आनंद लक्ष्मण पटेल, विनित सुनिल गेरेलानी, आयुष विकी साहित्य आणि शुभ रामलखन अग्रवाल हे चौघेही जियाच्या संपर्कात होते.

जिया कलाकार असून सध्या ती मिरारोडच्या नियजर जीसीसी क्लब, हटकेश रोड, लोधा कासा मॅक्सिमाच्या टॉवर तीन, फ्लॅट क्रमांक 203 मध्ये राहते. आयुष हा तिचा मित्र असून ते दोघेही लिव्ह अ‍ॅण्ड रिलेशनशीपमध्ये राहत असल्याचे बोलले जाते. या चौघाांच्या बँक खात्याचे स्टेटमेंटची पाहणी केल्यानंतर त्यात जिया जेकब हिच्या बँक खात्यात मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार झाल्याचे उघडकीस आले होते. या कटातील मुख्य आरोपी मार्क ऊर्फ महेश खेमलानी याच्या सांगण्यावरुन त्यांनी ही रक्कम जियाच्या खात्यात पाठविली होती. याबाबत त्यांच्यात आर्थिक व्यवहाराचे अनेक चॅट झाले होते.

जियाच्या बँक खात्यात आनंदने 64 हजार, विनितने 22 हजार 500 शुभने 1 लाख 66 हजार 400 तर आयुषने 1 लाख 84 हजार 600 रुपये पाठविले होते. तपासात आलेल्या या माहितीनंतर जियाला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. या गुन्ह्यांत तिचा सहभाग उघडकीस येताच तिला बुधवारी पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर तिला गुरुवारी दुपारी बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने तिला पोलीस कोठडी सुनावली आहे.

दुसरीकडे पोलीस कोठडीत असलेल्या आयुषने गुन्हा दाखल होताच पोलादपूर येथे काही गोळ्या फेंकून दिल्या होत्या. त्यापैकी 933 गोळ्या पोलिसांनी जप्त केल्या असून त्याची किंमत 15 लाख 39 हजार 450 रुपये इतकी आहे. या गोळ्यांमध्ये 116 जांभळ्या, 55 हिरव्या, 303 चॉकलेटी आणि 459 गुलाबी रंगाच्या गोळ्यांचा समावेश आहे. रिचासह इतर आरोपींमध्ये झालेल्या आर्थिक व्यवहाराची समोरासमोर चौकशी होणार आहे.

त्यांच्या बँक खात्यात इतर काही लोकांनी पैसे ट्रान्स्फर केले होते, त्यांचे नावे काढण्यात आली असून त्यांचीही पोलिसांकडून लवकरच चौकशी होणार आहे. ड्रग्ज पुरविणारी ही एक सराईत टोळी असून त्यांचा इतर काही ड्रग्ज तस्करांशी संबंध उघडकीस आले आहे. त्यामुळे या टोळीतील इतर आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page