हेरॉईन डिलीव्हरीसाठी आलेल्या 26 वर्षांच्या तरुणाला अटक
झटपट पैशांसाठी ग्राहकांना ड्रग्ज पुरविण्याचे काम सुरु केले होते
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
24 एप्रिल 2026
मुंबई, – कांदिवली परिसरात ड्रग्ज डिलीव्हरीसाठी आलेल्या एका 26 वर्षांच्या तरुणाला समतानगर पोलिसांच्या एका विशेष पथकाने अटक केली. विकी विधाकर पाडमुख असे या आरोपी तरुणाचे नाव असून त्याच्याकडून पोलिसांनी 65 ग्रॅम वजनाचे हेरॉईन जप्त केले आहे. झटपट पैशांसाठी विकीने ग्राहकांना ड्रग्ज पुरविण्याचे काम सुरु केले होते, मात्र पहिल्याच प्रयत्नात तो पोलिसांच्या तावडीत सापडला. त्याच्याविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत कारवाई करण्यात आली असून याच गुन्ह्यांत त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने सोमवार 27 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
विक्री हा कांदिवलीतील दामूनगर, हनुमान मंदिर, खोपे चाळीत राहत असून त्याचे एसवाय बीकॉमपर्यंत शिक्षण झाले आहे. ड्रग्ज व्यवसायात चांगला फायदा होत असल्याने त्याने ग्राहकांच्या त्यांच्या मागणीनुसार ड्रग्ज पुरविण्याचे काम सुरु करण्याचा निर्णय घेतला होता. गेल्या काही महिन्यांपासून तो काही ड्रग्ज पेडलरच्या संपर्कात होता. याबाबतची माहिती प्राप्त होताच पोलिसांनी त्याच्यावर नजर ठेवली होती. बुधवारी 22 एप्रिलला विकी एका ग्राहकाला हेरॉईनची डिलीव्हरीसाठी कांदिवली परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
या माहितीनंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयवंत शिंदे, पोलीस निरीक्षक अजीतसिंग राजपूत यांच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू चौधरी, पोलीस उपनिरीक्षक राहुल वाळुंजकर, पोलीस अंमलदार किणी, निजाई, कस्तुरे, बिटके आणि पवार यांनी कांदिवलीतील लोखंडवाला कॉम्प्लेक्स, क्रांतीनगर रिक्षा स्टॅण्डजवळ साध्या वेशात पाळत ठेवली होती. सायंकाळी पावणेपाच वाजात तिथे विकी आला होता, त्याची हालचाल संशयास्पद वाटताच त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्याच्या अंगझडतीत पोलिसांना 65 ग्रॅम वजनाचे हेरॉईन सापडले. त्याची किंमत 9 लाख 75 हजार रुपये इतकी आहे.
तपासात तो तिथे हेरॉईन विक्रीसाठी आला होता, मात्र त्यापूर्वीच त्याला पोलिसांनी अटक केली. त्याचा ड्रग्ज विक्रीचा पहिला प्रयत्न फसला गेला. त्याच्याविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून याच गुन्ह्यांत त्याला रात्री उशिरा पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला गुरुवारी दुपारी बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. त्याला ड्रग्ज पुरविणार्या पेडलरचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.