मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
27 एप्रिल 2026
मंबई, – तीन दिवसांपूर्वी अंधेरी परिसरात कुजलेल्या अवस्थेत सापडलेल्या एका अज्ञात वयोवृद्ध महिलेच्या हत्येचा पर्दाफाश करण्यात अंधेरी पोलिसांना यश आले आहे. कुठलाही पुरावा नसताना या महिलेची ओळख पटवून दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली. ब्लान्स जेम्स सिक्वेरा असे या हत्या झालेल्या वयोवृद्ध महिलेचे नाव असून तिच्या हत्येप्रकरणी तिचा भाऊ जोसेफ थॉमस कोयलो (65) आणि त्याची पत्नी मारिया जोसेफ कोयलो (63) या दोघांना पोलिसांनी अटक केली. सतत होणार्या भांडणाला कंटाळून या दोघांनी ब्लान्स सिक्वेराची हत्या करुन तिच्या हत्येचा पुरावा नष्ट करण्यासाठी तिचा मृतदेह ड्रेनेज लाईनमध्ये टाकून पलायन केले होते. अटकेनंतर या दोघांनाही लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
24 एप्रिलला दुपारी साडेतीन वाजता अंधेरीतील मरोळ पाईपलाईन, ओमनगर परिसरात मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडच्या मोकळ्या जागेवरील ड्रेनेज लाईनचे महानगरपालिकेचे काही कर्मचारी काम करत होते. बंद मेनहोलचे झाकण उघडल्यानंतर या कर्मचार्यांना पाच ते सहा फुट खोल असलेल्या ड्रेनेज लाईनमध्ये एक मृतदेह सापडला होता. ही माहिती नंतर संबंधित कर्मचार्यांनी अंधेरी पोलिसांना दिली होती. त्यानंतर अंधेरी पोलिसांचे एक पथक घटनास्थळी रवाना झाले होते. मृतदेह एका वयोवृद्ध महिलेचा होता, मृतदेह पूर्णपूर्ण कुजलेला होता, त्यामुळे तिची ओळख पटली नव्हती. त्यामुळे पोलिसांनी एडीआरची नोंद करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला होता. तिची ओळख पटली नसल्याने तिची ओळख पटविण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न सुरु केले होते.
मृतदेहावर मिळून आलेले दागिने आणि इतर माहितीच्या आधारे या महिलेची ओळख पटली होती. ब्लान्स जेम्स सिक्वेरा असे या 80 वर्षांच्या वयोवृद्ध महिलेचे नाव होते. ती अंधैरीतील ए. के रोड, मरोळ पाईपलाईन, आलोक चाळीतील रुम क्रमांक दहामध्ये राहत होती. 10 जानेवारी 2026 तिची सहार पोलीस ठाण्यात मिसिंग तक्रार करण्यात आली होती. ही तक्रार तिचा भाऊ जोसेफ थॉमस कोयलो याने केली होती. तपासात आलेल्या माहितीनंतर पोलिसांनी जोसेफची आणि त्याची पत्नी मारिया यांची चौकशी केली होती. या चौकशीदरम्यान ब्लान्स हिचे जोसेफ आणि मारिया यांच्यात सतत भांडण होत होते.
ब्लान्स ही मिसिंग होण्यापूर्वी म्हणजे 9 जानेवारी त्यांच्यात क्षुल्लक वादातून भांडण झाले होते. या भांडणानंतर ती अचानक मिसिंग झाली होती. हाच धागा पकडून पोलिसांनी जोसेफ, मारिया आणि त्यांचा मुलगा काल्टन यांची चौकशी सुरु केली होती. या चौकशीत जोसेफ यानेच ब्लान्सची सतत होणार्या भांडणाला कंटाळून हत्या केल्याचे उघडकीस आले होते. या हत्येनंतर त्याने पुरावा नष्ट करण्यासाठी तिचा मृतदेह बंद मेनहोलच्या ड्रेनेज लाईनमध्ये टाकून पलायन केले होते. या कटात जोसेफला त्याची पत्नी मारिया हिने मदत केली होती. हत्येनंतर दुसर्या दिवशी त्यांनी तिची मिसिंग तक्रार केली होती.
तपासात आलेल्या माहितीनंतर पोलिसांनी जोसेफ आणि मारिया या दोघांना अटक केली. अटकेनंतर त्यांना लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. अत्यंत कुजलेल्या अवस्थेत सापडलेल्या वयोवृद्ध महिलेची हत्या करुन तिच्या हत्येचा पुरावा नष्ट करुन कुठलाही पुरावा नसताना पोलिसांनी मृत महिलेच्या भावासह त्याच्या पत्नीला शिताफीने अटक करुन या हत्येचा पर्दाफाश केला होता.
ही कामगिरी पोलीस आयुक्त देवेन भारती, अतिरिक्त पोलीस आयुक्त परमजीतसिंह दहिया, पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे, सहाय्यक पोलीस आयुक्त गजानन पवार, पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मगर, पोलीस उपनिरीक्षक किशोर परकाळे, समाधान सुपे, संजय अकोलकर, पोलीस हवालदार शिंदे, पुजारी, कांबरी, घडवले, गायकवाड, पोलीस शिपाई पाटील, म्हात्रे, लोंढे, गवळी, शिंदे, पाटील, तिघोटे, टरके, घुले, नरबट, मोरे, विशाल पिसाळ यांनी केली.