मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
27 एप्रिल 2026
मुंबई, – गोरेगाव येथील नेस्को सेंटरमधील ड्रग्जप्रकरणी पोलीस कोठडीत असलेल्या जिया रेचल प्रदीप जेकब हिच्या कोठडीची मुदत संपत असल्याने सोमवारी दुपारी तिला पुन्हा बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने तिच्या पोलीस कोठडीत गुरुवार 30 एप्रिलपर्यंत वाढ केली होती. ड्रग्जच्या आर्थिक व्यवहारात जियाने महत्त्वाची भूमिका पार पाडल्याचे तपासात उघडकीस आले आहे. तिच्या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे बाहेर काढण्यात पोलिसांना यश आले आहे. जिया ही कटातील मुख्य आरोपी मार्क ऊर्फ महेश हिरा खेमलानी याच्या 2012 पासून संपर्कात होती, ते दोघेही लिव्ह इनमध्ये राहत असल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
गोरेगाव नेस्को ड्रग्जप्रकरणानंतर वनराई पोलिसांनी गुन्हा दाखल करुन आतापर्यंत दहाजणांना अटक केली होती. या आरोपींच्या चौकशीतून जिया जेकबचा सहभाग उघडकीस आला होता. कलाकार असलेली जिया ही मिरारोड येथे राहत होती. तिला 22 एप्रिलला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत तिचे काही आरोपींशी संबंध असल्याचे उघडकीस आले होते. ड्रग्जच्या आर्थिक व्यवहारात तिचा प्रत्यक्ष सहभाग उघड झाला होता. त्यामुळे तिच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली होती. याच गुन्ह्यांत ती 27 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत होती. तिच्या पोलीस कोठडीची मुदत सोमवारी संपत होती, त्यामुळे तिला पोलीस बंदोबस्तात बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने तिच्या पोलीस कोठडीत वाढ केली होती.
आतापर्यंतच्या तपासात जिया या कटातील मुख्य आरोपी मार्क ऊर्फ महेश खेमलानी याच्या संपर्कात होती. ते दोघेही एकमेकांच्या परिचित होते. महेशसोबत ती गेल्या चार वर्षांपासून लिव्ह इनमध्ये राहत होती. त्यामुळे तो कुठे आहे, तो कोणाच्या संपर्कात होता याची तिला माहिती आहे. महेश हा ड्रग्जच्या व्यवसायात होता याची जियाला माहिती होती. या गुन्ह्यांतील अटकेत असलेल्या आनंद पटेल, विनित गेरेलानी, विनित अग्रवाल आणि आयुष साहित्य यांचे बँक खाते जिया आणि महेश हे दोघेही वापरत होते. या दोघांनी आतापर्यंत 14 लाख 95 हजार 400 रुपये कॅश स्वरुपात जमा केले होते. ती रक्कम त्यांनी कोठून आणली, कोणत्या व्यवसायातून मिळविली याचा तिच्याकडून तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.