व्यावसायिकाची दहा लाखांची कॅश पळविणार्या आरोपीस अटक
पळालेल्या दोघांचा शोध सुरु तर चोरीची सात लाखांची कॅश जप्त
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
27 एप्रिल 2026
मुंबई, – कांदिवलीतील एका व्यावसायिकाच्या अॅक्टिव्हा बाईकच्या डिक्कीतील लॉक तोडून आतील दहा लाखांची कॅश चोरी करुन पळून गेलेल्या एका आरोपीस गुजरात येथून कांदिवली पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी सात लाखांची कॅश जप्त केली आहे. या गुन्ह्यांत इतर दोघांचा सहभाग उघडकीस आला असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. दरम्यान अटकेनंतर आरोपीला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावलीद आहे.
निखिल अरविंद शाह हे कांदिवली येथे राहत असून त्यांचा स्टॉक मार्केटचा व्यवसाय आहे. 7 एप्रिला दुपारी दोन वाजता ते त्यांच्या परिचित मिलिंद शाह यांच्या मालाड येथील घरी गेले होते. त्यांच्याकडून त्यांनी व्यवसायाची दहा लाखांची कॅश घेतली होती. ही कॅश घेऊन ते त्यांच्या अॅक्टिव्हा बाईकवरुन कांदिवलीला आले होते. ही कॅश त्यांनी अॅक्टिव्हाच्या डिक्कीमध्ये ठेवली होती. सोसायटीच्या आवारात बाईक पार्क करुन ते दुकानात सामान घेण्यासाठी गेले होते. तेथून ते पुन्हा बाईकजवळ आले. त्यांनी डिक्कीतील कॅश काढण्याचा प्रयत्न केला अतसा त्यांना डिक्कीचे लॉक तुटलेले दिसले. डिक्कीतील सुमारे दहा लाखांची कॅश अज्ञात व्यक्तीने चोरी करुन पलायन केले. यावेळी त्यांनी आजूबाजूला असलेल्या लोकांकडे विचारणा केली. मात्र त्यांना याबाबत काहीच माहिती नसल्याचे समजले.
या प्रकारानंतर त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक करण सोनकवडे यांची भेट घेऊन त्यांना घडलेला प्रकार सांगून अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची करण सोनकवडे यांनी गंभीर दखल घेत पोलिसांना अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदवून तपासाचे आदेश दिले होते. याप्रकरणी चोरीचा गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तपासाला सुरुवात केली होती. परिसरातील 125 हून अधिक सीसीटिव्ही फुटेजची तपासणी करुन पोलिसांनी आरोपीची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला होता.
या फुटेज आणि तांत्रिक माहितीवरुन अतिरिक्त पोलीस आयुक्त शशिकुमार मीना, पोलीस उपायुक्त संदीप जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त निता पाडवी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक करण सोनकवडे, पोलीस निरीक्षक शेखर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नितीन साटम, पोलीस हवालदार जोपळे, गौतम, जोगलपुरे, पोलीस शिपाई वाघमारे, नादकर, आदित्य राणे आदी पथकाने एका संशयिताला गुजरात येथून ताब्यात घेतले. चौकशीत त्याने त्याच्या इतर दोन मित्रांच्या मदतीने ही चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून पोलिसांनी सात लाखांची कॅश जप्त केली आहे. याच गुन्ह्यांत नंतर त्याला पोलिसांनी अटक केली.
अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याचे इतर दोन्ही सहकारी पळून गेल्याने त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. त्यांच्याकडून उर्वरित कॅश लवकरच हस्तगत केली जाणार असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक करण सोनकवडे यांनी सांगितले.