हेव्ही डिपॉझिटच्या पैशांचा अपहारप्रकरणी फ्लॅटमालकाला अटक
गुन्ह्यांत फ्लॅट मालकाच्या पत्नीसह ब्रोकरचा सहभाग उघडकीस
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
27 एप्रिल 2026
मुंबई, – हेव्ही डिपॉझिटच्या सुमारे वीस लाखांचा अपहार करुन एका महिलेची फसवणुक केल्याचा आरोप असलेल्या फ्लॅटमालकाला मालाड पोलिसांनी अटक केली. साहेब जगन्नाथ सिंग असे या आरोपी मालकाचे नाव असून फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. या गुन्ह्यांत मनप्रित कौर साहेब सिंग आणि रॉनी लिओ कार्व्हओ यांचा सहभाग उघडकीस आला असून ते दोघेही सहआरोपी असल्याचे पोलिसांनी सांगितले. या तिघांनी संगनमत करुन ही फसवणुक केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
निता सुरजसिंह मल्होत्रा ही 37 वर्षांची तक्रारदार महिला मालाड येथे राहते. ती मूळची पंजाबची रहिवाशी असून कामानिमित्त ती तिच्या पती आणि मुलीसोबत 2018 साली मुंबईत आले होते. तिच्या मालकीचे अमृतसर येथे घर आणि मोकळी जागा होती, ती प्रॉपटी विकून त्यांना मुंबई शहरात हेव्ही डिपॉझिटवर एक फ्लॅट घ्यायचा होता. फ्लॅटचा शोध सुरु असताना तिच्या एका मित्राने तिची रॉनी कार्व्हओशी ओळख करुन दिली होती. रॉनी हा मालाड परिसरात ब्रोकर म्हणून काम करत होता. त्याने तिला मालाड परिसरात हेव्ही डिपॉझिटवर रुम देण्याचे आश्वासन दिले होते. काही दिवसांनी त्याने तिला त्याच्या इमारतीमध्ये नवव्या मजल्यावर बी विंगमधील फ्लॅट 904 उपलब्ध असल्याचे सांगून तिला फ्लॅट पाहण्यासाठी बोलाविले होते.
या फ्लॅटसाठी दोन पार्टी तयार आहे, त्यापूर्वी तिला फ्लॅट पसंद पडला की तिच्यासोबत घरमालकाशी ओळख करुन तिला हेव्ही डिपॉझिटवर फ्लॅट देतो असे सांगितले होते. त्यामुे निता ही तिच्या पतीसोबत जानेवारी 2023 रोजी मालाड येथील न्यू एम्पायर, वर्धमान एम्पायर सहकारी सोसायटीमधील फ्लॅट पाह्यासाठी गेली होती. तो फ्लॅट नंदू अहिरे याने 20 लाखांना हेव्ही डिपॉझिटवर दिला होता. त्याला आता तीस लाख रुपये हवे आहे असे सांगितले. फ्लॅट पसंद पडल्याने तिने तीस लाखांच्या हेव्ही डिपॉझिटवर फ्लॅट घेण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी रॉनीने 23 जानेवारी 2023 रोजी फ्लॅटचे मालक येणार आहे, त्यांच्याशी चर्चा करुन फ्लॅटचा व्यवहार करु असे सांगितले. ठरल्याप्रमाणे 24 जानेवारीला ती फ्लॅट मालकाला भेटण्यासाठी गेली होती. यावेळी रॉनीने तिची ओळख साहेब सिंग व त्याची पत्नी मनप्रित कौरशी करुन दिली होती. तो फ्लॅट त्यांच्याच मालकीचा असल्याचे ते दोघेही सध्या गोरेगाव येथे राहत असल्याचे सांगितले.
चर्चेअंती त्यांच्यात आधी वीस लाख आणि फ्लॅटचा ताबा मिळाल्यानंतर अकरा लाख रुपये देण्याचे ठरले होते. ठरल्याप्रमाणे तिने त्यांना 20 लाख आरटीजीएस आणि पाच लाख कॅश स्वरुपात दिले होते. दोन दिवसांत फ्लॅटचा ताबा देतो असे सांगून त्यांनी फ्लॅटचा ताबा दिला नाही. सहा महिने उलटूनही फ्लॅटचा ताबा मिळत नसल्याने निता मल्होत्राने फ्लॅटचा व्यवहार रद्द करुन त्यांच्याकडून दिलेल्या हेव्ही डिपॉझिटची मागणी सुरु केली होती. यावेळी त्यांनी तिला पाच लाख रुपये परत केले. मात्र उर्वरित वीस लाख रुपये परत न करता तिची फसवणुक केली.
या प्रकारानंतर तिने मालाड पोलिसांना घडलेला प्रकार सांगून आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर साहेब सिंग, मनप्रित कौर आणि रॉनी कार्व्हओ या तिघांविरुद्ध पोलिसांनी हेव्ही डिपॉझिटच्या वीस लाखांचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत नंतर साहेब सिंगला पोलिसांनी अटक केली. पोलीस कोठडीनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.