क्रिप्टो करन्सी गुंतवणुकीच्या बहाण्याने 60 लाखांची फसवणुक
सायबर ठगांना बँक खाती पुरविणार्या आरोपीस अटक
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
27 एप्रिल 2026
मुंबई, – क्रिप्टो करन्सी गुंतवणुकीच्या बहाण्याने एका खाजगी कंपनीच्या वरिष्ठ अधिकार्याला सुमारे 60 लाखांना गंडा घालण्यात आला होता, याच गुन्ह्यांत अरबाज वसीम मंसुरी नावाच्या एका आरोपीस उत्तर प्रादेशिक विभागाच्या सायबर सेल पोलिसांनी अटक केली. फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याच्यावर सायबर ठगांना फसवणुकीसाठी बँक खाती पुरविल्याचा आरोप आहे. त्याच्या बँक खात्यात इतर काही फसवणुकीची रक्कम ट्रान्स्फर झाल्याचे बोलले जात असून या गुन्ह्यांची माहिती काढली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले. गुन्ह्यांतील इतर आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.
सुभाषचंद्र रामचंद्र यादव हे कांदिवलीतील रहिवाशी असून ते त्यांच्या पत्नी आणि मुलीसोबत राहतात. एका खाजगी कंपनीत टेक्निकल मॅनेजर म्हणून काम करतात. 15 फेब्रुवारी 2026 रोजी त्यांना एका खाजगी कंपनीच्या व्हॉटअप ग्रुपमध्ये अॅड करण्यात आले होते. या ग्रुपमध्ये गुंतवणुकीबाबत सल्ला दिला जात होता. ग्रुपमधील बहुतांश सभासदांनी क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणुक केली होती. तसेच काही सभासदांनी म्युचअल फंड आणि स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणुक केल्याचे दिसून आले. त्यांना क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणुक करायची होती, त्यामुळे त्यांना ग्रुपच्या अॅडमिनने एक लिंक पाठविली होती. ही लिंक ओपन करुन त्यांनी एक ट्रेडिंग प्लेटफॉर्म ओपन केले होते. तिथे त्यांची वैयक्तिक माहितीसह बँक खात्याची डिटेल्स शेअर केली होती.
18 फेब्रुवारी ते 6 मार्च 2026 या कालावधीत त्यांनी क्रिप्टो करन्सीमध्ये 60 लाख 61 हजार 780 रुपयांची गुंतवणुक केली होती. त्यापूर्वी त्यांनी त्यांच्या बँक खात्यातून 92 हजार रुपये विड्रोल केले होते. गुंतवणुकीवर रक्कम मिळत असल्याने त्यांनी ही गुंतवणुक सुरुच ठेवली होती. या गुंतवणुकीवर त्यांना अल्पावधीत प्रचंड फायदा झाला होता. त्यांच्या खात्यात 2 लाख 17 हजार 118 डॉलर जमा झाले होते. त्यामुळे त्यांनी मार्च महिन्यांत पुन्हा पैसे विड्राल करण्यासाठी कंपनीकडे अर्ज केला होता, यावेळी कंपनीने त्यांना त्यांचा अर्ज प्रोसेसिंगमध्ये असल्याचे सांगितले. याच दरम्यान त्यांना ग्रुप अॅडमिनने ही रक्कम त्यांच्या बँक खात्यात पाठविण्यासाठी पंधरा टक्के भरावे लागतील असे सांगितले. मात्र स्वतची रक्कम बँक खात्यात जमा करण्यासाठी त्यांनी अतिरिक्त रक्कम जमा करण्यास नकार दिला होता. त्यानंतर ग्रुप अॅडमिनने त्यांच्याशी संभाषण बंद केले होते.
फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच त्यांनी एनसीसीआर पोर्टलसह उत्तर सायबर सेल पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर पोलिसांनी अज्ञात सायबर ठगाविरुद्ध भारतीय न्याय सहिता आणि आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तपास सुरु केला होता. तांत्रिक माहितीवरुन पोलिसांनी अरबाज मंसुरीला ताब्यात घेतले होते. चौकशीत तक्रारदाराच्या खात्यातून त्याच्या बँक खात्यात काही रक्कम ट्रान्स्फर झाली होती. ही रक्कम पुढे त्याने संबंधित सायबर ठगांना दिली होती. गुन्ह्यांतील मुख्य आरोपींना त्याने बँक खाती पुरविल्याचा आरोप आहे.
या गुन्ह्यांसह इतर काही गुन्ह्यांतील रक्कम त्याच्या बँक खात्यात जमा झाले होते. तपासात ही माहिती उघडकीस येताच त्याला पोलिसांनी अटक केली. अकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत इतर काही आरोपींचा सहभाग उघडकीस आला असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.