मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
27 एप्रिल 2026
मुंबई, – मालाडच्या मालवणी परिसरात व्हेल माशांच्या उलटीची विक्रीसाठी आलेल्या एका 24 वर्षांच्या तरुणाला मालवणी पोलिसांनी अटक केली. अदनान आसिफ खान असे या आरोपीचे नाव असून तो बोरिवलीचा रहिवाशी आहे. त्याच्याकडून पोलिसांनी एक कोटी पंधरा लाख रुपयांचा 1 किलो 157 ग्रॅम वजनाचे व्हेल माशांची उलटी हस्तगत केली आहे. त्याच्याविरुद्ध भारतीय न्याय सहिता आणि वन्य प्राणी संरक्षणकायदा कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून याच गुन्ह्यांत त्याला बोरिवलीतील लोकल कोटाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
शनिवारी रात्री उशिरा पोलीस उपनिरीक्षक डॉ. दिपक हिंडे, पोलीस हवालदार अनिल पाटील, धर्माधिकारी, स्वप्निल काटे, पोलीस शिपाई साजिद शेख, कालिदास खुडे आदी पोलीस पथक वरिष्ठांच्या आदेशावरुन गस्त घालत होते. रात्री साडेबारा वाजता मालाडच्या मालवणी, मार्वे रोड, साईबाबा मंदिरासमोर एक तरुण संशयास्पद फिरत होता. त्यामुळे त्याला पोलिसांनी हटकले असता तो पोलिसांना पाहताच पळू लागला. यावेळी पोलिसांनी त्याला पाठलाग करुन त्याला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने पोलिसांवर हल्ला करुन सरकारी कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनीही बळाचा वापर करुन त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याच्याकडील सामानाची तपासणी केल्यानंतर त्यात पोलिसांना 1 किलो 157 ग्रॅम वजनाचे व्हेल माशांची उलटी सापडली.
या उलटीची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत एक कोटी पंधरा लाख सत्तर हजार रुपये इतकी आहे. तपासात तो तिथे व्हेल माशांची उलटी विक्रीसाठी आला होता, मात्र विक्री करण्यापूर्वीच त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्याला पोलीस ठाण्यात आणल्यानंतर त्याच्याविरुद्ध विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.
तपासात आरोपीचे नाव अदनान खान असल्याचे उघडकीस आले. अदनान हा बोरिवलीतील कुलूपवाडी, राईटेकडी, शिवशक्ती चाळीत राहत असून अॅमेझॉनमध्ये काम करतो. त्याला व्हेल माशांची उलटी ठाण्यातील एका तरुणाने विक्रीसाठी दिली होती. त्याने ती उलटी सुरत शहरातून आणली होती. सुरत शहरात व्हेल माशांची उलटी खरेदी-विक्री करणारी एक टोळी सक्रिय आहे. ही टोळी त्यांच्या हस्तकामार्फत विविध शहरात व्हेल माशांची उलटीची विक्री करत असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. त्यामुळे मालवणी पोलिसांची एक टिम लवकरच ठाण्यासह सुरतला इतर आरोपींच्या अटकेसाठी जाणार असल्याचे पोलीस उपनिरीक्षक डॉ. दिपक हिंडे यांनी सांगितले. अदनानचा हा पहिलाच प्रयत्न होता, त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी नसल्याचे तपासात उघडकीस आले आहे.