मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
29 एप्रिल 2026
मुंबई, – तुर्की येथून भारतात प्रत्यार्पण करण्यात कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा खास सहकारी मोहम्मद सलीम डोला याचा ताबा बुधवारी मुंबई युनिटच्या नारकोटीक्स कंट्रोल ब्युरोकडे सोपविण्यात आला. ताबा मिळताच त्याला पुढील कारवाईसाठी मुंबईत आणण्यात आले असून ड्रग्जच्या गुन्ह्यांत त्याला गुरुवारी विशेष सेशन कोर्टात हजर केले जाणार आहे. मोहम्मद सलीम हा दाऊद इब्राहिम टोळीसाठी ड्रग्जचे सर्व व्यवहार पाहत असल्याने त्याच्या अटकेने दाऊदला प्रचंड धक्का बसल्याचे बोलले जाते. त्याच्या अटकेने दाऊदच्या ड्रग्जशी संबंधित अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
मोहम्मद सलीम हा दाऊदचा अत्यंत खास सहकारी होता. त्याच्या निवडक जवळच्या सहकार्यांमध्ये मोहम्मद सलीम याचे नाव होते. दाऊद विदेशात पळून गेल्याने काही वर्षांनी त्याने मोहम्मद सलीमला विदेशात बोलावून घेतले होते. त्याच्यावर ड्रग्जची सर्व जबाबदारी सोपविण्यात आली होती. विदेशात बसून त्याने भारतासह इतर देशात ड्रग्जचे जाळे पसरविले होते. या ड्रग्जच्या व्यवसायातून दाऊदला कोट्यवधी रुपये मिळत होते. मोहम्मद सलीमविरुद्ध मुंबई पोलिसांसह एनसीबीमध्ये अनेक गुन्ह्यांची नोंद होती. या गुन्ह्यांत त्याला वॉण्टेड आरोपी दाखविण्यात आले होते. तो विदेशात वास्तव्यास असल्याने त्याच्याविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस बजाविण्यात आली होती. ही नोटीस जारी झाल्यानंतर त्याच्या अटकेसाठी भारतीय तपास यंत्रणा प्रयत्नशील होते.
त्याचा शोध सुरु असताना मोहम्मद सलीम हा काही महिन्यांपासून तुर्की येथे वास्तव्यास असल्याची माहिती प्राप्त होताच भारतीय तपास यंत्रणेने इंटरपोलच्या मदतीने त्याला अटक केली होती. तो वॉण्टेड आरोपी मोहम्मद सलीम असल्याचे उघडकीस येताच त्याला भारतात प्रत्यार्पण करण्यात आले होते. मंगळवारी त्याला तुर्की येथून दिल्ली विमानतळावर आणण्यात आले होते. त्यानंतर बुधवारी त्याचा ताबा मुंबई युनिटच्या नारकोटीक्स सेलने घेतला होता. दोन दिवसांची ट्रॉन्झिंट रिमांड घेतल्यानंतर त्याला दिल्लीहून पुढील कारवाईसाठी मुंबईत आणण्यात आले. त्याला एनसीबीच्या दक्षिण मुंबईतील कार्यालयात नेण्यात आले असून तिथेच त्याची चौकशी सुरु करण्यात आली आहे. मुंबई एनसीबीमध्ये मोहम्मद सलीम डोसाविरुद्ध सात ते आठ गुन्ह्यांची नोंद आहे. या सर्व गुन्ह्यांत त्याला अटक करुन त्याची चौकशी होणार आहे.
31 डिसेंबर 1966 साली मोहम्मद सलीमचा जन्म झाला असून त्याला हिंदी आणि मराठी भाषेचे ज्ञान आहे. त्याच्याविरुद्ध मुंबईसह गुजरात व इतर राज्या ड्रग्जशी संबंधित अनेक गुन्हे दाखल केला आहे. त्याच्या काही सहकार्यांना यापूर्वी पोलिसांनी अटक करुन त्यांच्याकडून कोट्यवधी रुपयांचा ड्रग्जचा साठा जप्त केला होता. त्यांच्या चौकशीत मोहम्मद सलीमचे नाव आल्यानंतर त्याला या गुन्ह्यांत वॉण्टेड आरोपी दाखविण्यात आले आहे. त्यामुळे या सर्व गुन्ह्यांची त्याची चौकशी होणार असून या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे बाहेर येण्याची शक्यता आहे.