अज्ञात व्यक्तीकडून रेल्वे पोलिसांकडे पाच कोटीची मागणी

पैसे दिले नाहीतर रेल्वे स्थानकासह कार्यालयाला टार्गेट करण्याची धमकी

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
28 एप्रिल 2026
मुंबई, – शहरातील उद्योगपतीसह व्यावसायिक आणि व्यापार्‍यांना खंडणीसाठी धमकी येत असल्याच्या अनेक घटना आतापर्यंत घडल्या आहेत, मात्र एका अज्ञात व्यक्ती चक्क रेल्वे पोलिसांच्या कंट्रोल रुममध्ये कॉल करुन रेल्वे पोलिसांकडेच पाच कोटीची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पैसे दिले तर ठिक नाहीतर रेल्वे स्थानकासह शासकीय कार्यालयाला टार्गेट करण्याची धमकीच देण्यात आली आहे. या धमकीची वरिष्ठ रेल्वे पोलिसांनी गंभीर दखल घेत अज्ञात व्यक्तीविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेला दिले होते. या गुन्ह्यांचा मुंबई पोलिसांकडून संमातर तपास केला जात आहे. धमकी देणार्‍या अज्ञात व्यक्तीला लवकरच अटक केली जाईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

रेल्वे पोलिसांच्या कंट्रोल रुमला मंगळवारी एका अज्ञात व्यक्तीने कॉल केला होता. या व्यक्तीने त्याचे नाव इरफान असल्याचे सांगितले होते. इतर विषयांवर न बोलता त्याने चक्क कंट्रोल रुममधील पोलीस कर्मचार्‍याला पाच कोटीसाठी धमकी दिली होती. पाच कोटीची व्यवस्था करा नाहीतर रेल्वे स्थानकासह शासकीय कार्यालयांना टार्गेट करु अशी धमकी दिली होती. इतकेच नव्हे तर सर्वसामान्य मुंबईकांना प्राण वाचवायचे असेल तर पैशांची लवकरात लवकर सोय करा असे सांगितले. यावेळी संबंधित पोलिसांने त्याच्याशी जास्तीत जास्त बोलण्याचा प्रयत्न केला. त्याच्याविषयी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याने इतर काहीही माहिती न देता कॉल बंद केला.

या कॉलनंतर संबंधित पोलीस कर्मचार्‍याने ही माहिती त्याच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना दिली होती. या धमकीची वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी गंभीर दखल घेत शहरातील सर्व प्रमुख रेल्वे स्थानकात सतर्क राहण्याचे सूचना केल्या. जास्तीत जास्त पोलीस बंदोबस्त ठेवा, संशयित व्यक्तीची चौकशी करा, त्यांच्या सामानाची झडती घेण्याचे आदेश जारी केले होते. दरम्यान या धमकीनंतर अज्ञात व्यक्तीविरुद्ध पोलिसांनी भारतीय न्याय सहिता कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा स्थानिक रेल्वे पोलिसांसह गुन्हे शाखेकडून तपास सुरु आहे.

आरोपीच्या अटकेसाठी मुंबई पोलिसांना सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे मुंबई पोलिसांनी संमातर तपास सुरु केला आहे. इरफान नाव सांगणारा व्यक्ती कोण, त्याने कोठून कॉल केला होता, कॉल करुन धमकी देण्यामागे त्याचा काय उद्देश होता याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे. या गुन्ह्यांत काही महत्त्वाची माहिती रेल्वे पोलिसांना प्राप्त झाली असून आरोपीच्या अटकेसाठी रेल्वे पोलिसांची विशेष मोहीम हाती घेतली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page