सोन्याच्या दागिन्यांच्या चोरीप्रकरणी कारागिराला अटक
दहा लाखांचे शंभर ग्रॅम दागिने चोरी केल्याचा आरोप
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
28 एप्रिल 2026
मुंबई, – सोन्याच्या दागिन्यांच्या चोरीप्रकरणी वॉण्टेड असलेल्या तरुण लक्ष्मण दोलाई या कारागिराला दहिसर पोलिसांनी अटक केली. त्याच्यावर कारखान्यातील ड्राव्हरमधील दहा लाखांचे शंभर ग्रॅम वजनाचे दागिने चोरी केल्याचा आरोप असून चोरीचे सर्व दागिने लवकरच हस्तगत केले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.
विजय चंदूलाल मधानी हे ज्वेलर्स व्यापारी असून ते बोरिवली परिसरात राहतात. त्यांचा सोन्याचे दागिने बनविण्याचा व्यवसाय असून त्यांच्या मालकीचा दहिसर येथील चुन्नाभट्टी रोड, श्रीजी डायमंड इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये एक कारखाना आहे. याच कारखान्यात सोन्याची चैन, ब्रेसलेट बनवून ते झव्हेरी बाजारातील ज्वेलर्स व्यापार्यांना होलसेलमध्ये विक्री करतात. त्यांच्याकडे तीन कारागिर असून त्यात लक्ष्मण दोलाई याचा समावेश होता. या कारखान्यातील सर्व व्यवहाराची जबाबदारी त्याच्यावर होती. 8 एप्रिलला पहाटे चार वाजता तो कारखान्यात आला आणि त्याने ड्राव्हरमधील सुमारे दहा लाखांचे सोन्याचे दागिने घेतले. ते दागिने विजय मधानी यांना द्यायचे आहे असे सांगून तो कारखान्यातून निघून गेला.
दुसर्या दिवशी विजय मधानी हे कारखान्यात आले होते. यावेळी त्यांनी ड्राव्हरमधील दागिन्यांची पाहणी केली, त्यात त्यांना दहा लाखांचे शंभर ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने दिसले नाही. चौकशीनंतर त्यांना तरुण दोलाई हा त्यांच्या नावाने सोन्याचे दागिने घेऊन गेल्याचे समजले. त्यामुळे त्यांनी तरुणला मोबाईलवर संपर्क साधला, मात्र त्याने त्यांचा कॉल रिसीव्ह केला नाही किंवा त्यांना नंतर कॉल केला नाही. त्यामुळे ते तरुणच्या दहिसर येथील कांदरपाडा, नयागावातील घरी गेले होते. तिथे त्यांना तरुण एक आठवड्यापासून आला नसल्याचे समजले. तरुण हा एका तरुणीच्या संपर्कात होता. त्याचे तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. तो तिच्यासोबत जास्त वेळ दिसत होता.
तरुण हा दहा लाखांचे शंभर ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरी करुन पळून गेल्याची खात्री होताच त्यांनी दहिसर पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला होता. त्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तरुण दोलाईविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होताच त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही शोधमोहीम सुरु असताना दोन दिवसांपूर्वी तरुण दोलाई याला पोलिसांनी अटक केली. चौकशीत त्याने सोन्याच्या दागिन्यांची चोरी केल्याची कबुली दिली. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु असून त्याच्याकडून लवकरच चोरीचे सर्व दागिने हस्तगत केले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.