वाढदिवसाच्या प्रसिद्धीसाठी रस्त्यावर पेट्रोल टाकून आग लावली
सोशल मिडीयावर व्हिडीओ टाकणार्या बर्डबॉयविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
28 एप्रिल 2026
मुंबई, – स्वतचा वाढदिवस साजरा करण्यासाठी एका व्यक्तीने भरस्त्यात 33 क्रमांक काढून त्यावर पेट्रोल ओतून आग लागून त्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल केल्याचा प्रकार गोरेगाव परिसरात उघडकीस आला आहे. हा व्हिडीओ सोशल मिडीयावर टाकणे त्याच्या चांगलेच अंगलट आले, याबाबत तक्रार प्राप्त होताच फहद खलील समशुद्दीन शेख या 33 वर्षांच्या या बर्डबॉयविरुद्ध गोरेगाव पोलिसांनी गुन्हा नोंदवून त्याच्यावर अटकेची कारवाई केली.
23 एप्रिलला रात्री अकरा वाजता पोलीस आयुक्ताच्या ट्विट हॅडलवर दक्ष नागरिकाने फहद शेख नावाच्या एका व्यक्तीने गोरेगाव येथील राम मंदिर रोड, सोनानी ग्रामजवळ रस्त्यावर पेट्रोल ओतून आग लावून, त्याचे रिल्स तयार करुन ते रिल्स सोशल मिडीयावर अपलोड केल्याची तक्रार केली होती. या तक्रारीची वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी गंभीर दखल घेत संबंधित व्यक्तीविरुद्ध कारवाईचे आदेश दिले होते. या आदेशानंतर पोलीस निरीक्षक अब्दुल रौफ शेख, पोलीस शिपाई वैभव इनकर, गुन्हे शाखेसह बीट क्रमांकाच्या पोलीस कर्मचार्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती.
चौकशीत फहद खलील शेख याचा रविवारी 33 वा वाढदिवस दिला हातेा. स्वतच्या वाढदिवसाच्या प्रसिद्धीसाठी त्याने रस्त्यावर 33 क्रमांक काढून त्यावर पेट्रोल ओतून आग लावली होती. या आगीचे व्हिडीओ बनवून त्याने सोशल मिडीयावर तो व्हिडीओ अपलोड केली होती. हा व्हिडीओ सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल झाला होता. तपासात आलेल्या माहितीनंतर फहद शेख याच्याविरुद्ध पोलिसांनी सार्वजनिक रस्त्यावर पेट्रोल हा ज्वालाग्राही पदार्थ टाकून त्यास आग लावून मानवी जिवीत किंवा इतरांची व्यक्तिगत सुरक्षा धोक्यात येणारी किंवा दुखापत होण्यास संभव असलेले बेदकारपणाची कृती केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.
गुन्हा दाखल होताच त्याच्यावर पोलिसांनी अटकेची कारवाई केली होती. अटकेनंतर त्याला सोडून देण्यात आले असून त्याला योग्य ती समज देण्यात आली आहे. केवळ स्वतच्या वाढदिवसाच्या प्रसिद्धीसाठी त्याने सदरचे कृत्य केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.