माजी खासदाराचा मुलगा असल्याची बतावणी करुन फसवणुक
गुंतवणुकीवर दुप्पट रक्कमेच्या आमिषाने अनेकांना घातला गंडा
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
28 एप्रिल 2026
मुंबई, – गुजरातच्या माजी खासदाराचा मुलगा असल्याची बतावणी करुन एका ठगाने एका व्यावसायिकासह इतरांची लाखो रुपयांची फसवणुक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शेअरमध्ये गुंतवणुक केल्यास हमखास सहा महिन्यांत दुप्पट रक्कम देतो असे सांगून त्याने आतापर्यंत गंडा घातला आहे. याप्रकरणी विकी वजूभाई बरेजिया ऊर्फ विकी प्रजापती या आरोपीविरुद्ध खार पोलिसांनी भारतीय न्याय सहिता कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. विकीने मुंबईसह गुजरातमध्ये अशा प्रकारचे गुन्हे केल्याचे बोलले जात असून या संपूर्ण प्रकरणाची पोलिसांकडून चौकशी सुरु असल्याचे सांगण्यात आले.
स्वरंजीतसिंग बजाज हे व्यावसायिक असून ते त्यांच्या कुटुंबियांसोबत खार परिसरात राहतात. त्यांची पंजाब सिंद प्रोडेक्टस नावाची एक खाजगी कंपनी आहे. गेल्या वर्षी मार्च महिन्यांत त्यांची विकी बरेजियाशी ओळख झाली होती. यावेळी विकीने तो गुजरातचा रहिवाशी असून त्याचे वडिल माजी खासदार आहेत. त्यांचा विश्वास बसावा म्हणून त्याने त्यांचे मेंबर्स ऑफ पार्लेमेंटचे ओळखपत्र दाखविले होते. त्याचे सेंट्रल गव्हरमेंट ऑफ इंडिया, आयएएस आणि आयपीएस अधिकार्यांशी चांगली ओळख असल्याचे सांगितले. त्यामुळे त्यांची चांगली मैत्री झाली होती. ते दोघेही एकमेकांच्या संपर्कात होते. एप्रिल 2025 रोजी विकी हा मुंबईत आला होता. यावेळी त्याने त्यांना शेअरमध्ये गुंतवणुकीचा सल्ला दिला.
या गुंतवणुकीवर त्यांना सहा महिन्यांत दुप्पट रक्कम देण्याचे आमिष दाखविले होते. यावेळी तो अनेकांशी गुंतवणुकीबाबत चर्चा करत होता. त्यातील बहुतांश व्यक्ती आयएएस आणि आयपीएस अधिकारी असल्याचे सांगत होता. त्यामुळे त्याच्यावर विश्वास ठेवून त्यांनी शेअरमध्ये गुंतवणुकीचा निर्णय घेतला होता. 29 एप्रिल ते 29 सप्टेंबर 2025 या कालावधीत त्यांनी त्याच्याकडे टप्याटप्याने 41 लाख 39 हजार 900 रुपयांची गुंतवणुक केली होती. ही रक्कम कॅशसहीत आरटीजीएस/एनएफटीद्वारे त्याच्या बँक खात्यात ट्रान्स्फर करण्यात आली होती. या गुंतवणुकीनतर त्याने त्यांना पावणेदहा लाख रुपये परत केले तसेच काही शेअर विकत घेऊन दिले होते. नंतर त्याने गुंतवणुकीवर प्रॉफिटची रक्कम देणे बंद केले होते.
चौकशीदरम्यान त्यांना विकीने त्यांच्यासह अनेकांना शेअरमध्ये गुंतवणुक केल्या दुप्पट रक्कम देण्याचे आमिष दाखविले होते. त्यात त्यांच्या एका मित्राचा समावेश होता. त्याच्याकडून त्याने पाच लाख रुपये घेतले होते. मात्र कोणालाही मोबदला न देता त्यांची फसवणुक केली होती. विचारणा केल्यानंतर तो धमकी देत होता. त्याच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार केल्यास गंभीर परिणाम होतील असे सांगत होता. या घटनेनंतर स्वरंजीतसिंग बजाज यांनी खार पोलिसांना घडलेला प्रकार सांगून विकी प्रजापतीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीत त्यांनी विकीने त्यांची 18 लाख 69 लाखांची फसवणुक केल्याचा आरोप केला.
या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदारासह इतर काही लोकांची विकीने फसवणुक केली आहे. त्यामुळे फसवणुकीचा हा आकडा आणखीन वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. विकीकडून फसवणुक झालेल्या लोकांनी खार पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.