वयोवृद्ध महिलेचे खरे दागिने चोरी करुन बेन्टेक्सचे दागिने ठेवले

35 वर्षांच्या केअरटेकर महिलेविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
28 एप्रिल 2026
मुंबई, – वयोवृद्ध महिलेची काळजी घेताना तिच्या सोन्याच्या दागिन्यावर हातसफाई करुन त्याजागी बेन्टेक्सचे दागिने ठेवून एका 35 वर्षांच्या केअरटेकर महिलेने स्वतची चोरी लपविण्याचा प्रयत्न केला, मात्र बेन्टेक्सचे दागिने जास्त चमकत असल्याने तिचा चोरीचा हा बनाव उघड झाला. याप्रकरणी आरोपी केअरटेकर महिलेविरुद्ध बोरिवली पोलिसांनी चोरीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. पूजा असे या महिलेचे नाव असून ती विरार येथे राहत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

64 वर्षांचे सतीशकुमार बाळकृष्ण नायर हे त्यांची 59 वर्षांची पत्नी गिता आणि 89 वर्षांची आई अम्मीनीसोबत बोरिवलीतील चिकूवाडी, शिंपोली निरंजन अपार्टमेंटमध्ये राहतात. त्यांच्या आईने 25 वर्षांपूर्वी सोन्याच्या पाच बांगड्या आणि एक सोन्याची चैन घेतली होती. ते दागिने ती दिवसभर घालत होती, रात्री झोपण्यापूर्वी सर्व काढून ड्राव्हरमध्ये ठेवत होती. त्यांची आई वयोवृद्ध असल्याने तिचा सांभाळ तसेच काळजी घेण्यासाठी त्यांनी पूजाला केअरटेकर म्हणून कामावर ठेवले होते. मे 2022 पासून पूजा त्यांच्याकडे काम करत असल्याने त्यांचा तिच्यावर विश्वास होता. तिला ते घरातील एक सदस्य म्हणून वागणुक देत होते.

20 मार्चला सतीशकुमार हे त्यांची आई अम्मीनीची चौकशीसाठी गेले होते. यावेळी त्यांना त्यांच्या आईच्या हाताील बांगड्या जास्त चमकत असून नवीन असल्यासारखे वाटले. हा प्रकार त्यांनी त्यांच्या पत्नीला सांगितला. हा प्रकार या दोघांनाही संशयास्पद वाटला. त्यामुळे त्यांनी आईचे दागिने एका सोनाराला दाखविले. या सोनाराने ते दागिने सोन्याचे नसून बेन्टेक्स असल्याचे सांगितले. त्यांच्या घरी पूजा वगळता इतर कोणीही येत नव्हते. त्यामुळे आईची काळजी घेताना पूजाने तिचे खरे सोन्याचे दागिने चोरी केले, त्याजागी बेन्टेक्सचे दागिने ठेवून स्वतची चोरी लपविण्याचा प्रयत्न केला होता.

हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी तिला जाब विचारला, मात्र तिने त्यांना काहीच प्रतिसाद दिला नाही. 1 एप्रिलनंतर तिने कामावर येणे बंद केले होते. याबाबत तिने त्यांना काहीच सांगितले नव्हते. त्यामुळे सतीशकुमार नायर यांनी घडलेला प्रकार बोरिवली पोलिसांना सांगून त्यांच्या घरातील केअरटेकर महिला पूजाविरुद्ध चोरीची तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर पूजाविरुद्ध पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून तिची लवकरच पोलिसांकडून चौकशी होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page