मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
29 एप्रिल 2026
मुंबई, – क्रेनची धडक लागून एका 55 वर्षांच्या महिलेचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी ताडदेव परिसरात घडली. संगता नामदेव कांबळे असे या मृत महिलेचे नाव असून तिच्या मृत्यूप्रकरणी क्रेन चालक कमलेश धुसई यादव याला ताडदेव पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला सोडून देण्यात आल्याचे सांगण्यात आले.
हा अपघात मंगळवारी सकाळी साडेअकरा ते पावणेबारा वाजता ताडदेव येथील बेलासिस ब्रिजजवळ झाला. चंद्रकांत नामदेव कांबळे हा मजुरीचे काम करत असून सध्या ताडदेव परिसरात राहतो. मृत संगीता ही त्याची आई असून ती सफाई कर्मचारी म्हणून काम करत होती. मंगळवारी सकाळी साडेअकरा वाजता संगीता बेलासिस ब्रिजजवळ झोपली होती. यावेळी तेथून जाणार्या एका क्रेनने तिला जोरात धडक दिली होती. तिच्या पायावर क्रेन गेल्याने ती गंभीररीत्या जखमी झाली होती.
अपघाताची माहिती मिळताच ताडदेव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. अपघातात जखमी झालेल्या संगीताला तातडीने नायर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले. याप्रकरणी चंद्रकांत कांबळे याच्या तक्रारीवरुन पोलिसांनी क्रेन चालक कमलेश यादव याच्याविरुद्ध हलगर्जीपणाने क्रेन चालवून एका महिलेच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत नंतर त्याला पोलिसांनी अटक केली.
कमलेश हा मूळचा उत्तरप्रदेशच्या गाजीपूर, गजाधरचा रहिवाशी असून सध्या तो ताडदेव येथील महालक्ष्मी रेसकोर्स गेट क्रमांक एकजवळ राहत असल्याचे पोलिसांनी सांगितले.